आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्यातील १३४ खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी केंद्र सरकारने मान्यता दिली आहे. कोविड लसीकरणात महाराष्ट्र हा संपूर्ण देशात राजस्थाननंतर दुसऱ्या क्रमांकावर असल्याची बाब समाधानकारक आहे. मात्र दर दिवशी ३ लाख डोस दिले पाहिजेत या दृष्टीने नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी आरोग्य विभागास दिले.
विभागीय आयुक्तांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे लसीकरणासंदर्भात बैठकीत ते बोलत होते. या वेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे, मुख्य सचिव सीताराम कुंटे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
राज्यात आतापर्यंत दिले ३६ लाख डोस : कोविड लसीकरणात १८ मार्च रोजीच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र संपूर्ण देशात दुसऱ्या स्थानी आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली. आत्तापर्यंत दोन्ही मिळून ३६ लाख ३ हजार ४२४ डोस देण्यात आले असून केवळ राजस्थान ३६ लाख ८४ हजार डोस देऊन महाराष्ट्रापेक्षा किंचित पुढे आहे. महाराष्ट्राने ३१ लाख ५ हजार १६९ पहिला डोस आणि ४ लाख ९८ हजार २५५ दुसरे डोस असे लसीकरण केले आहे. तर राजस्थानने ३० लाख ९२ हजार ६३५ पहिले डोस व ५ लाख ९२ हजार २०८ दुसरे डोस दिले आहेत.
वाया जाण्याचे प्रमाण ६%: काही राज्यांत २० टक्क्यांपर्यंत लस वाया जाते. मात्र महाराष्ट्रात हे प्रमाण केवळ ६% आहे, ते शून्यावर आले पाहिजे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
... तर एप्रिल महिन्यात ३ लाख सक्रिय रुग्ण
१७ सप्टेंबर २०२० रोजी असलेल्या रुग्णसंख्येपेक्षा उच्चांकी संख्या गाठली असून अशीच वाढती संख्या राहिल्यास एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात ३ लाख सक्रिय रुग्ण राज्यात होऊ शकतात. त्यामुळे सर्वांनी प्राधान्याने आरोग्याचे नियम पाळणे आवश्यक आहे, अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.