आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
इंग्लंडमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळून आल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात मंगळवार (दि.२२) पासून पुढील १५ दिवस सर्व महानगरपालिका क्षेत्रात रात्री ११ ते पहाटे ६ पर्यंत संचारबंदी लागू केली आहे. ५ जानेवारीपर्यंत ही संचारबंदी असणार आहे. या निर्णयाने ख्रिसमस आणि नववर्ष साजरे करण्याची जय्यत तयारी करत असलेल्या नागरिकांचा हिरमोड झाला आहे. युरोप आणि मध्य-पूर्व देशांतून येणाऱ्या सर्व प्रवाशांना ते विमानतळावर उतरल्यापासून १४ दिवस संस्थात्मक क्वाॅरंटाइन करण्याचा तसेच अन्य देशांमधून येणाऱ्या प्रवाशांना होम क्वाॅरंटाइन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे राज्यात अधिकची खबरदारी घेण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले. प्रादुर्भावाला रोखण्यासाठी परदेशातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची कडक तपासणी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
अत्यावश्यक सेवांना मुभा : दूध, शेतमाल व अत्यावश्यक सेवांच्या वाहतुकीवर या रात्रीच्या संचारबंदीचा कोणताही परिणाम होणार नाही. त्यामुळे महापालिका क्षेत्रात वस्तू व अन्नधान्याची टंचाई जाणवणार नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
हॉटेलात 2 हजार खोल्या राखीव
सोमवारी व मंगळवारी इंग्लंडहून मुंबईत पाच विमाने पोहोचत आहेत. त्यातील हजारभर प्रवाशांना ७ दिवस हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवले जाणार आहे. त्यासाठी पंचतारांकित हाॅटेलांत २ हजार खोल्या राखीव ठेवण्यात आल्याची माहिती बृहन्मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली.
लॉकडाऊन नव्हे : राज्यात पुन्हा लॉकडाऊन करणार नाही, असे रविवारीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले होते. त्यामुळे रात्रीची संचारबंदी ही लॉकडाऊन नाही. लाॅकडाऊनमध्ये घराबाहेर पडण्यास बंदी असते. संचारबंदीत पाच व त्यापेक्षा अधिक लोकांनी एकत्र यायचे नाही. संचारबंदी केवळ महापालिका क्षेत्रात लागू असून त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलिसांवर आहे.
जिल्हाधिकारी, आयुक्तांची बैठक
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा प्रकार आढळल्याच्या पार्श्वभूमीवर अधिकची काळजी घेण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त यांची लवकरच बैठक घेण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या वेळी जिल्ह्यातील तयारीचा आढावा घेतला जाणार आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.