आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आघाडी सरकार चक्रव्यूहात:मुंबईत 1750 बार, रेस्तरॉं; प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख घ्या... परमबीर यांचे पत्र

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • शरद पवार, अजित पवारांसह अनेक मंत्र्यांच्या कानावर ही गोष्ट घातली होती - परमबीरसिंग यांचा पत्रामध्ये दावा

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे याच्याकडे दरमहा १०० कोटी रुपये मागितले होते, असा धक्कादायक आरोप गृहरक्षक दलाचे प्रमुख परमबीरसिंग यांनी केला आहे. अँटिलिया स्फोटके आणि सचिन वाझे प्रकरणावरून नुकतेच परमबीर यांना मुंबई पोलिस आयुक्तपदावरून हटवण्यात आले आहे. परमबीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले असून यामध्ये थेट गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. पत्राची प्रत त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही पाठवली आहे.

परमबीर यांनी आपल्या पत्रामध्ये सोशल मीडियावरील चॅटही पुरावा म्हणून सादर केले आहे. विशेष म्हणजे आपण ही गोष्ट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याही कानी घातली होती, असा दावाही परमबीर यांनी केला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले आहेत. स्वत:चा बचाव करण्यासाठी त्यांनी आरोप केल्याचे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.

गृहमंत्री देशमुखांनी राजीनामा द्यावा; अन्यथा मुख्यमंत्र्यांनी हकालपट्टी करावी : फडणवीस
नागपूर | परमबीर यांच्या गंभीर आरोपांनंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नैतिकतेच्या आधारावर तत्काळ राजीनामा द्यावा, ते राजीनामा देत नसतील तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा किंवा त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात केली. मुख्यमंत्र्यांना कल्पना दिली असूनही त्यांनी देशमुखांवर का कारवाई केली नाही, असाही सवाल फडणवीसांनी केला.

पत्र मिळाले, शहानिशा सुरू : मुख्यमंत्री
मुंबई | गृहरक्षक दलाचे कमांडंट जनरल परमबीरसिंग यांचे पत्र मिळाले, परंतु त्यावर केवळ नाव लिहिलेले असून स्वाक्षरी नाही. paramirs3@gmail.com या ईमेल पत्त्यावरून मुख्यमंत्री सचिवालयास पत्र मिळाले आहे. वास्तविक परमबीर यांनी अधिकृतरीत्या दिलेला वैयक्तिक ईमेल पत्ता parimbirs@hotmail.com असा आहे, त्यामुळे त्याची शहानिशा करण्यात येत असल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने म्हटले आहे.

मुंबईत 1750 बार, रेस्तरॉं; प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख घ्या... परमबीर यांचे पत्र
अँटिलिया प्रकरणावेळी ‘वर्षा’बंगल्यावरील भेटीवेळी गृहमंत्र्यांची अनेक चुकीची कामे मी आपल्या कानावर घातली होती. उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह अनेक वरिष्ठ मंत्र्यांनाही सांगितले होते. फेब्रुवारीच्या मध्यात सचिन वाझे यांना अनेक वेळा गृहमंत्री देशमुख यांनी आपल्या शासकीय निवासस्थानी बाेलावले होते. बहुतांश वेळा त्यांचे स्वीय सहायक पलांडेही उपस्थित होते. गृहमंत्र्यांनी वाझेंना सांगितले की, माझे दरमहा १०० कोटी रुपये वसुलीचे टार्गेट आहे. मुंबईत १,७५० बार, रेस्टॉरंट‌्स आहेत. प्रत्येकाकडून दोन-तीन लाख रुपये जमा केले तरीही महिन्यात ४० ते ५० कोटी रुपये आरामात जमा होतात. उर्वरित रक्कम इतर स्रोतांमार्फत गोळा केली जाऊ शकते.

वाझे यांनी त्याच दिवशी कार्यालयात येऊन मला ही माहिती दिली. काही दिवसांनंतर गृहमंत्र्यांनी सामाजिक सेवा शाखेचे सहायक पोलिस आयुक्त संजय पाटील यांना हुक्का पार्लरसंंबंधी चर्चेसाठी बोलावले. त्या वेळीही पलांडे आणि इतर अधिकारी तिथे हजर होते. दोन दिवसांनंतर उपायुक्त भुजबळ यांनाही बंगल्यावर बोलावले. वाझेंना जे सांगितले तेच या वेळी पलांडे यांनी संजय पाटील यांना बाजूला नेऊन सांगितले. ही ४ मार्चची गोष्ट आहे. पाटील यांनीही मला हा घडलेला प्रकार सांगितला होता. माझ्या माघारी अधिकाऱ्यांना बोलावून त्यांना शासकीय कामांसोबतच टार्गेटही दिले जात होते. माझे अधिकारी मला याबाबत माहिती द्यायचे. चौकशीसंदर्भातही गृहमंत्री पोलिस अधिकाऱ्यांना सूचना करीत होते. असा राजकीय हस्तक्षेप असंवैधानिक आणि अवैध आहे. सर्वोच्च न्यायालयानेही अशा राजकीय हस्तक्षेपाबद्दल ताशेरे ओढले आहेत.

भाजप खासदार मोहन डेलकर प्रकरण मुंबईत दाखल करण्यासाठी दबाव : दादरा नगर हवेलीचे भाजप खासदार मोहन डेलकर यांच्या मृत्यू प्रकरणात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा मुंबईत दाखल करावा यासाठी पहिल्या दिवसापासूनच गृहमंत्री देशमुख यांचा आग्रह होता. आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे हे प्रकरण दादरा-नगर हवेलीचे असल्याने तेथील पोलिसांनी त्याची चौकशी करावी,असे माझे मत होते. कायदेशीर सल्ल्यानंतरच माझे हे मत बनले होते. आपल्या भेटीत (मुख्यमंत्री) हे आपल्या कानावर घातले होते. माझ्या विरोधामुळे या प्रकरणाचा राजकीय फायदा घेता येत नसल्याने गृहमंत्री नाराज झाले होते. ९ मार्च रोजी विधानसभेत गृहमंत्र्यांनी याप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची व एफआयआर दाखल करण्याची घोषणा केली.

चुकीमुळे बदली आरोप चुकीचा : गंभीर व अक्षम्य चूक केल्याने माझी बदली करण्यात आली हा गृहमंत्री देशमुख यांचा आरोप साफ चुकीचा आहे. त्यांचे हे विधान बदली आदेशाच्या अगदी प्रतिकूल आहे. मला बळीचा बकरा बनवण्यात आले आहे.

हिरेन मृत्यू प्रकरण एनआयएकडे, पांढरा कुर्ता घालून वाझेंना चालवले
मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणाचा तपासही आता राष्ट्रीय तपास संस्थेकडे ( एनआयए) सोपवण्यात आला आहे. आतापर्यंत महाराष्ट्र एटीएस या मृत्यू प्रकरणाचा तपास करीत होते. मात्र अँिटलियाजवळ स्फोटके ठेेवण्यासाठी हिरेन यांच्या एसयूव्हीचा वापर करण्यात आला होता. यामुळे केंद्रीय गृह मंत्रालयाने हिरेन प्रकरणही एनआयएकडे सोपवले आहे.

शुक्रवारी रात्री नाट्यरूपांतर करून अँटिलिया स्फोटके ठेवण्याचा घटनाक्रम उभा करण्यात आला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये पीपीई किट घातलेली एक व्यक्ती घटनास्थळी दिसते. ही व्यक्ती वाझेच असल्याचा संशय एनआयएला आहे. त्यामुळे नाट्य रूपांतरावेळी वाझे यांना पांढरा कुर्ता घालून ७ ते ८ वेळा चालण्यास सांगण्यात आले.

हिरेनची हत्या की संशयास्पद मृत्यू ?
परमबीर यांच्या आरोपानंतर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी तत्काळ सोशल मीडियावर स्पष्टीकरण देताना मनसुख हिरेन ‘हत्या प्रकरण’ असा उल्लेख केला होता. मात्र नंतर प्रसिद्धी पत्रकात मात्र मनसुख हिरेन यांचा ‘संशयास्पद मृत्यू’ असे म्हटल्याने नव्याच वादाला तोंड फुटले आहे. सिंगविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा दाखल करू, असे गृहमंत्री म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...