आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य सरकारने केंद्राकडे विविध विकासकामांसाठी 18 हजार कोटींचे प्रस्ताव पाठवले आहेत. राज्यात आता सामान्यांचे भाजप, शिवसेना युतीचे सरकार असल्यामुळे केंद्राकडून आम्हाला हा पूर्ण निधी मिळेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्ली येथे निती आयोगाचा बैठक पार पडली. सर्व राज्याचे मुख्यमंत्री बैठकीस हजर होते. बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत राज्य सरकारतर्फे केंद्राकडे करण्यात आलेल्या मागण्यांबाबत माहिती दिली.
एकनाथ शिंदे म्हणाले, राज्यात तलावांचे पुनर्जीवन करण्यात येणार आहे. जलयुक्त शिवार, शहर सौंदर्यीकरणाचे प्रकल्प सुरू आहेत. नवी मुंबईत शेकडो एकरवर नैना प्रकल्प उभारला जात आहे. याशिवाय समृद्धी महामार्गाच्या आजुबाजूच्या परिसरातही औद्योगिक केंद्रे उभारण्यात येणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे. या सर्व कामांसाठी खरे तर 28 हजार कोटी रुपयांचे उद्दीष्ट आहे. मात्र, प्राथमिक टप्प्यात केंद्राकडे 18 हजार कोटींचा प्रस्ताव दिला आहे. हा सर्व निधी मिळेल अशी आशा आणि अपेक्षा आहे.
जीएसटी परतावा वेळेवर मिळेल
थकीत जीएसटी परताव्यावरुन महाविकास आघाडी आणि केंद्र सरकारमध्ये चांगलेच खटके उडायचे. केंद्राकडून वेळेत परतावा मिळत नसल्याने मविआच्या नेत्यांकडून केंद्रावर वारंवार टीका केली जात होती. मात्र, आता केंद्राकडून जीएसटी परतावा वेळेवर मिळेल का, यावर शिंदे म्हणाले, आता सर्व थकित जीएसटी परतावा वेळेवर मिळेल. राज्यात आता सर्वासामान्यांच्या हिताचे सरकार आले आहे. केंद्रासोबत आमचा चांगला ताळमेळ असून केकंद्र राज्याला पूर्ण सहकार्य करेल.
मंत्रिमंडळ विस्तार लवकरच
मंत्रिमंडळ विस्ताराबाबत एकनाथ शिंदे म्हणाले, सध्या सुप्रीम कोर्टात आमदारांच्या अपात्रतेबाबत सुरु असलेल्या याचिकांचा आणि मंत्रिमंडळ विस्ताराचा कोणताही संबंध नाही. या सुनावणीमुळे मंत्रिमंडळ विस्तारात कोणतीही अडचण येणार नाही. तसेच, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी मंत्रिमंडळ विस्तारावरुन एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली होती. मुख्यमंत्री केवळ लवकरच एवढाच शब्द बोलतात, अशी टीका अजित पवारांनी केली होती. त्यावर शिंदे म्हणाले, आम्ही मंत्रिमंडळ विस्ताराची तारीख सांगावी अशी कदाचित विरोधी पक्षनेत्यांची मागणी असावी. त्यांचे आणि माझे जिव्हाळ्याचे, घनिष्ठ संबंध आहेत. मंत्रिमंडळ विस्ताराबाबत भाजपश्रेष्ठींकडून परवानगी भेटली नसल्याचे अजित पवारांचे म्हण्णे असेल. मात्र, तसे काही नाही. येत्या काही दिवसांत चित्र स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.
'मिशन 48' भाजप-शिवसेनेचे
राज्यात लोकसभा निवडणुकीसाठी 'मिशन 48' राबवणार असल्याचे भाजप नेते रावसाहेब दानवे म्हणाले होते. त्यामुळे भाजपच हे मिशन राबवणार असले तर शिंदे गटाचे काय? असा सवाल या निमित्ताने उपस्थित झाला होता. त्यावर एकनाथ शिंदे म्हणाले, भाजप आणि शिवसेना मिळून मिशन 48 राबवणार आहोत. याबाबत प्रश्न निर्माण करण्याचे कोणतेही कारण नाही. युतीचे सरकार लोकांसाठी मजबुतीने काम करेल.
फ्रेंडशीप डेच्या शुभेच्छा
आज मैत्री दिनानिमित्त शिंदे गटाच्या आमदारांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शुभेच्छा दिल्या. तसेच, एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांच्यातील फ्रेंडशीप पाहण्यास आम्हाला आवडेल, असेही आमदार म्हणाले. यावर शिंदे यांनी सांगितले, फ्रेंडशीप डे सर्वांसाठी असतो. माझ्या सर्वांना शुभेच्छा आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.