आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धारावीत स्क्रीनिंग:मुंबईत सापडले नवे 189 रुग्ण; दिवसभरात बारा जणांचा मृत्यू, पुण्यात नवीन 18 रुग्ण

मुंबई3 वर्षांपूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • राजधानीत कोरोनाचा फास घट्ट; कराड, धुळ्यातही मृत्यू

मुंबईतील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून शनिवारी तब्बल १८९ नवे कोरोनाग्रस्त सापडले असून १२ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मुंबई मनपाच्या आरोग्य विभागाने दिली. धारावीमध्ये कोरोनाग्रस्त शोधण्यासाठी स्क्रीनिंगलाही सुरुवात करण्यात आली आहे. ५० डॉक्टरांची टीम यासाठी काम करत आहे.

धारावीत चार रुग्णांचा बळी गेला आहे. तसेत दादर पश्चिममधील एकाच घरातील सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या कुटुंबातील एका व्यक्तीची तीन दिवसांपूर्वी चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यानंतर कुटुंबीतील पाच जणांचीही चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. चेंबूर परिसरातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी आहे. येथे कोरोनाचे ९ रुग्ण आढळले असून परिसरातील ५६ जणांना क्वाॅरंटाइन करण्यात आले आहे.  

मातोश्रीच्या आजूबाजूचा परिसर सील : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या मातोश्री येथील एका चहावाल्याला कोरोनाची लागण झाल्याने हा संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. आणखी काही दिवस हा संपूर्ण परिसर संचारबंदीत असेल, अशी माहिती मातोश्रीतील सूत्रांनी दिली.

नागपुरात आणखी दोन पॉझिटिव्ह, संख्या २७ वर

नागपूर| कोरोना संसर्गामुळे मृत्युमुखी पडलेल्या नागपुरातील एकमेव व्यक्तीच्या संपर्कातील आणखी दोन व्यक्ती चाचण्यांमध्ये पॉझिटिव्ह आल्याने उपराजधानीतही संकट वाढत असल्याचे संकेत मिळत आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे संसर्गमुक्त होऊन बऱ्या झालेल्या तीन रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

गेल्या आठवड्यात नागपुरात कोरोना संसर्ग झालेल्या ६८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबातील सहा जण पॉझिटिव्ह निघाले असताना शनिवारी त्या व्यक्तीच्या संपर्कातील आणखी २ जण पॉझिटिव्ह निघाल्याने संकट वाढत आहे. पोलिसांनी हा व्यक्ती राहत असलेला संपूर्ण सतरंजीपुरा परिसर सील केला असून तपासणी करण्यात येत आहे.

धुळ्यात मालेगावच्या बाधित तरुणीचा मृत्यू

धुळे| हिरे वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील काेराेना विलगीकरण कक्षात उपचार घेणाऱ्या मालेगावच्या २२ वर्षीय तरुणीचा शनिवारी पहाटे मृत्यू झाला. साक्रीतील व्यक्तीच्या मृत्यूनंतर दुसऱ्याच दिवशी कोरोनाबाधित तरुणीचाही मृत्यू झाला. काेराेना संसर्गाने दगावणाऱ्यांची संख्या २ झाली आहे. शनिवारी सकाळी तरुणीचा मृतदेह रुग्णवाहिकेतून मालेगावला नेण्यात आला. तरुणीच्या मृत्यूनंतर तिचे पालक व कुटुंबीयांना तपासणी करण्याचा सल्ला देण्यात आला.

कराडला कोरोनाग्रस्ताचा मृत्यू

सातारा| कराड येथे दाखल असलेल्या ५४ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा शनिवारी पहाटे ५ वाजता मृत्यू झाला. त्यामुळे सातारा जिल्ह्यात मृतांची संख्या दोनवर पोहाेचली आहे. मृत मुंबई येथे मत्स्य व्यवसाय करत होता. अहवालानुसार दि. ७ एप्रिल रोजी हा रुग्ण कोविड-१९ पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले. दरम्यान, रुग्णाला मधूमेह झाला होता.

पुण्यात नवीन 18 रुग्ण

पुणे |  शनिवारी दिवसभरात एकही मृत्यूची नोंद झाली नसल्यामुळे काहीसा आरोग्य विभागाला दिलासा मिळाला आहे. शहरात दिवसभरात २७ नवीन कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. पुणे शहरासह जिल्ह्यात आतापर्यंत २९ कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला.

पोलिसाच्या आईला बाधा

पुणे|  पुण्यातील विश्रांतवाडी पोलिस वसाहतीत मुलाकडे काही दिवसापूर्वी राहायला आलेल्या जेष्ठ महिलेचा कोरोना चा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. विश्रांतवाडी पोलिस वसाहतमध्ये रहाणारे पोलिस व त्यांचा भाऊ याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला असून सध्या या दोघांना कॉरटाईन करण्यात आले आहे. 

बातम्या आणखी आहेत...