आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

वादंग:लाॅकडाऊनमुळे आलेल्या भरमसाट वीज बिलात 20% सूट मिळणार! मंत्रिमंडळ बैठकीत ऊर्जामंत्र्यांचे टोचले कान

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वीज नियामक आयोग घेणार अंतिम निर्णय, 73 लाख ग्राहकांना लाभ

जून महिन्यात लाॅकडाऊनच्या काळातील भरमसाट वीज बिल ग्राहकांना पाठवल्यानंतर निर्माण झालेला जनतेतील असंतोष कमी करण्यासाठी महाविकास आघाडीच्या सरकारने वीज बिलात सूट देण्याचा निर्णय घेतला आहे. ही सूट २० ते ३०% असेल, अशी माहिती ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत यांनी बुधवारी दिली वाढीव वीज बिलासंदर्भात ऊर्जा विभाग एक प्रस्ताव महाराष्ट्र वीज नियामक आयोगाला पाठवेल. निर्णय घेण्याचा अंतिम अधिकार आयोगाला आहे, असे राऊत म्हणाले. त्याचा फायदा ७३ लाख ग्राहकांना मिळणार आहे. तत्पूर्वी, मंत्रिमंडळ बैठकीत वाढीव वीज बिलावर चर्चा झाली. वीज बिलाविरोधात वाढता असंतोष असल्याचा मुद्दा बैठकीत उपस्थित झाला. यावर तत्काळ तोडगा काढण्यात यावा, असा आग्रह अनेक मंत्र्यांनी धरला. त्यानंतर या गोंधळावर तत्काळ पावले उचला, अशा सूचना करून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी ऊर्जामंत्र्यांचे कान टोचले.

पुढील बैठकीत प्रस्ताव

वाढीव वीज बिलांबाबत बुधवारी बैठक घेण्यात आली. पुढील मंत्रिमंडळ बैठकीत लाखो घरगुती ग्राहकांना दिलासा देण्यासाठी प्रस्ताव आणला जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी सांगितले.

बिल भरण्यास मुदतवाढ देऊनही ग्राहकांमध्ये असंतोष

मार्च, एप्रिल आणि मे या लाॅकडाऊन कालावधीत मीटर रीडिंग न घेता वीज बिले सरासरीने पाठवण्यात आली होती. त्यातच ३० एप्रिल रोजी वीज दरवाढ करण्यात आली. त्यामुळे जून महिन्यातल्या बिलात तीन ते पाचपट वाढ आली होती. त्यानंतर राज्यात महावितरण कंपनीच्या विरोधात आंदोलन झाले. ठिकठिकाणी वीज बिलांची होळी करण्यात आली. महावितरणने वीज बिले भरण्यास मुदत वाढवून दिली. टप्प्याटप्प्याने वीज बिले भरण्यास सवलत दिली. मात्र ग्राहकांनी त्याला विशेष प्रतिसाद दिला नाही. असंतोष वाढत चालल्याने अखेर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून बिले कमी करण्याचे आदेश दिले