आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेश विसर्जन:मुंबईत 12500 गणपतींसाठी 24 तास, तर अमरावतीत 428 गणेश मंडळांची चालेल तब्बल 4 दिवस मिरवणूक

मुंबई/अमरावती/ यवतमाळ18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • यवतमाळ, अमरावतीत सुरक्षेच्या कारणामुळे गणेश मंडळे ठरवून दिलेल्या दिवशी करतात विसर्जन

राज्यात शुक्रवारी गणेश विसर्जन होणार आहे. कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदाच्या मिरवणुकीत अभूतपूर्व उत्साह पाहायला मिळणार आहे. अनेक ठिकाणी मिरवणूक अनेक तास चालणार असली तरी अमरावती आणि यवतमाळची मिरवणूक ही तासांत नाही दिवसांत होणार आहे.

मुंबईचा लालबागचा राजा आणि १२,५०० गणेश मंडळांची मिरवणूक २४ तास चालेल, असा अंदाज मंडळाने व्यक्त केला आहे, तर पुण्यातील यंदा २५ तासांपेक्षा जास्त काळ मिरवणूक सुरू राहील, असे सांगण्यात येत आहे.

यवतमाळमध्ये २ हजार ७९ सार्वजनिक मंडळांची मिरवणूक ही तीन तास सुरू राहणार आहे. तर अमरावतीत चार दिवस विसर्जन मिरवणूक सुरू राहणार असून ४२८ सार्वजनिक मंडळांना ४ दिवसांत मदत देण्यात येणार आहे.

अमरावतीत आज १२७ सार्वजनिक बाप्पांना निरोप
दहा दिवसांच्या मुक्कामानंतर शुक्रवारपासून (९ सप्टेंबर) श्री गणेश विसर्जनाला सुरुवात होत आहे. अमरावती शहरात बाप्पांचे विसर्जन एकाच दिवशी न करता ४ दिवस करण्यात येते. ९ सप्टेंबर रोजी शहरात १२७ शनिवारी, १० सप्टेंबरला १४१, ११ सप्टेंबर रोजी १३० आणि १२ सप्टेंबर रोजी ३० सार्वजनिक मंडळांकडून बाप्पांचे विसर्जन करण्यात येणार आहे. मागील अनेक वर्षांपासून अमरावती शहरात याच पद्धतीने विसर्जन केले जाते. एकाच वेळी सर्व मंडळाच्या विसर्जन मिरवणुका निघाल्यास पोलिसांवर बंदोबस्ताचा ताण आणि सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होतो. तसेच सार्वजनिक गणेश मंडळांकडूनही ठरावीक दिवशीच विसर्जन करण्याबाबत पोलिसांकडून परवानगी घेतली जाते. याच कारणांमुळे अनेक वर्षांपासून विसर्जन प्रक्रिया ४ दिवस सुरूच राहते.

यवतमाळ : ३ दिवसांत २ हजारांवर विसर्जन

यवतमाळमध्ये तीन दिवसांत २ हजार ७९ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेश मूर्तींचे विसर्जनाचे नियोजन करण्यात आले आहे. यात शुक्रवार ९ सप्टेंबर रोजी ७१३ मंडळांच्या मूर्तींचे, त्यानंतर दुसऱ्या दिवशी १० सप्टेंबर रोजी ९८३ तर ११ सप्टेंबर रोजी तिसऱ्या दिवशी १८० सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे आपल्या गणेश मूर्तींचे विसर्जन करणार आहेत. कुठलीही अनुचित घटना घडू नये. शांतता व सुव्यवस्था अबाधित राखली जावी, या हेतूने दरवर्षी पोलिस प्रशासनाकडून जिल्ह्यात तीन दिवस विसर्जनाचे नियोजन करण्यात येते.

बातम्या आणखी आहेत...