आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोणता झेंडा घेऊ हाती?:राज्यसभा निवडणुकीबाबत 29 आमदारांची दोलायमान स्थिती; इकडे मंत्रिपद, तर तिकडे ईडीची भीती

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभेच्या ६ जागांसाठी १० जून रोजी होत असलेल्या मतदानाबाबत महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात जोराची रस्सीखेच सुरू झाली आहे. भाजपविरोधात गेल्यास आपल्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा लागेल अशी भीती छोट्या व अपक्ष आमदारांना वाटते, तर दुसरीकडे शिवसेनेने अपक्ष व छोट्या पक्षाच्या आमदारांना चक्क मंत्रिपद व महामंडळे देण्याचे प्रलोभन दाखवण्यास सुरुवात केल्याने या २९ आमदारांची मोठी दोलायमान स्थिती झाली आहे.

२८८ सदस्यांच्या विधानसभेत २८७ आमदार (मतदार) आहेत. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे १५२, तर विरोधी बाकांवरच्या भाजपकडे १०६ सदस्यांचे बळ आहे. १३ अपक्ष व छोट्या पक्षांचे १६ सदस्य असून हे २९ आमदारच राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी गेमचेंजर ठरणार आहेत. या २९ आमदारांना गळाला लावण्याचे भाजप व शिवसेनेचे सोमवारी (६ जून) युद्धपातळीवर प्रयत्न सुरू होते. चारही बड्या पक्षांची रणनीती निश्चित झाली असून आता अंमलबजावणी सुरू झाली आहे. शिवसेनेचा दुसरा उमेदवार पडल्यास आघाडी सरकारच्या स्थैर्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे अत्यंत सावध पावले टाकली जात आहेत.

आमदारांची भाषा बदलली : ज्या अपक्ष व छोट्या पक्षांच्या बळावर शिवसेनेने दुसरा उमेदवार उभा केला त्या अपक्षांनी आता भाषा बदलण्यास प्रारंभ केला आहे. धान आणि हरभरा खरेदीच्या प्रश्नी तोडगा काढा, अन्यथा वेगळा विचार करू, असा इशारा प्रहारच्या बच्चू कडू यांनी दिला. मुस्लिम आरक्षणाचा प्रश्न आघाडी सरकारने मार्गी न लावल्याने समाजवादी पक्ष नाराज आहे. या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी लखनऊकडे बोट दाखवले आहे. अडीच वर्षांत आपली कामे झाली नसल्याचा सूर ३ आमदार असलेल्या बविआ अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांनी लावला. अपक्ष आमदार किशोर जोरगे यांनी शिवसेना प्रवक्ते संजय राऊतांच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली. शिवसेना समर्थक आशिष जयस्वाल यांनी मंत्री निधीतून टक्केवारी मागत असल्याची व्यथा मांडली, तर शेकापचे आमदार श्यामसुंदर शिंदे नाॅट रिचेबल आहेत.

अशी आहे विविध पक्षांची रणनीती
भाजप : विधानसभेच्या खर्चाची भरपाई, आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आर्थिक मदत, क्राॅस व्होटिंग करणाऱ्या विरोधी गटातील आमदारांना न्यायालयीन साहाय्य उपलब्ध करून देण्याची तयारी, केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा टळेल असे आश्वासन.

शिवसेना : हितेंद्र ठाकूर यांच्या बविआसारख्या बड्या पक्षांना मंत्रिपदाचे आमिष, महामंडळाची अध्यक्षपदे देण्याची तयारी, भरघोस विकास निधी देऊ, मतदारसंघातील विकासकामे मंजूर करण्यात येतील, पसंतीचे अधिकारी देण्यात येतील.

काँग्रेस : कोणताच आमदार अनुपस्थित राहू नये याची काळजी घेणार. हाॅटेलात सर्व आमदारांना ठेवणार, ८ तारखेला मुंबईत पोहोचण्याचे आदेश, पहिल्या पसंतीची ४४ मते इम्रान प्रतापगढी यांना मिळतील असे नियोजन. एमआयएम आणि समाजवादी पक्षाची मते मिळवण्याचे प्रयत्न.

राष्ट्रवादी : राष्ट्रवादी काँग्रेस आपली शिल्लक ९ मते शिवसेना उमेदवाराला देणार, स्वाभिमानी व अपक्ष पण सहयोगी आमदारांची मते शिवसेनेला देणार. प्रफुल्ल पटेल पहिल्या फेरीत निवडून यावेत यासाठी ४५ पेक्षा अधिक पहिल्या पसंतीची मते दिली जाणार आहेत.

मतदारसंघातील कामे अडणार नाहीत : मुख्यमंत्र्यांचा शब्द
मुंबई- सर्व शिवसेना आमदार आणि काही अपक्षांची मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्षा निवासस्थानी सोमवारी बैठक घेतली. ‘मतदारसंघातील तुमची कोणतीच कामे अडणार नाहीत. कुणाला घाबरायचे नाही, कुणाला जुमानायचे नाही,’ अशी हिंमत देत भाजपच्या दबावाला व प्रलोभनांना बळी न पडण्याचे आवाहन मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले. बैठकीला येताना आमदार बॅगा घेऊन आले होते. मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर वर्षा निवासस्थानाच्या दारातून सर्व आमदारांना पश्चिम उपनगरातील मढ आयलंडच्या रिट्रीट हॉटेलमध्ये व्होल्वो गाड्यातून सुरक्षित स्थळी पाठवण्यात आले. १० जून रोजी मतदानापर्यंत या आमदारांना सुरक्षित स्थळी हाॅटेलवर ठेवण्यात येणार आहे. मते फुटू नयेत यासाठी शिवसेना मोठी खबदारी घेत आहे.

आज आघाडीचे शक्तीप्रदर्शन

वांद्रे कुर्ला काॅम्पेक्स येथील ट्रायडंट हाॅटेलमध्ये मंगळवारी (ता.७) सायंकाळी महाविकास आघाडीच्या तसेच सहयोगी आमदारांची बैठक ठेवण्यात आली आहे. आघाडी सरकार स्थापन होताना जशी आमदारांना शपथ दिली, तसा शक्तीप्रदर्शनाचा कार्यक्रम होणार आहे. यातून आघाडी आपले संख्याबळ दाखवणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री उद्वव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि काँग्रेस प्रभारी मल्लीकार्जून खर्गे मार्गदर्शन करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...