आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागडकिल्ल्यांवर मद्यपान करणाऱ्यांना यापुढे किमान तीन महिने कारावास तसेच किमान दहा हजार रुपये दंड आकारण्याचे प्रस्तावित आहे. त्यासाठी हेरिटेज मार्शल नेमण्यात येतील. जे स्वयंसेवक असे प्रकार उघडकीस आणतील, त्यांना दंडाच्या पन्नास टक्के रक्कम बक्षीस म्हणून देण्याचेही प्रस्तावित आहे. राज्याच्या विधी व न्याय विभागाच्या मंजुरीसाठी हा प्रस्ताव पाठवण्यात आल्याची घोषणा सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सोमवारी (१३ मार्च) केली. रायगड किल्ला केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो. तो किमान पाच वर्षांसाठी तरी राज्य सरकारच्या ताब्यात द्यावा, अशी विनंती केंद्राला केल्याचेही ते म्हणाले. राज्यातील गडकिल्ल्यांच्या संरक्षण, जतन, संवर्धनाचा मुद्दा लक्षवेधी सूचनेच्या माध्यमातून उपस्थित करण्यात आला होता. संग्राम थोपटे, अशोक चव्हाण, भीमराव तापकीर आदींनी हा मुद्दा उपस्थित केला होता. त्यावर निवेदन करताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले, राज्यात ३८७ संरक्षित स्मारके आहेत. मागील सरकारच्या काळात या स्मारकांच्या देखभालीकडे दुर्लक्षच झाले होते. निधीदेखील पुरेसा दिला जात नव्हता. आता मात्र जिल्हा नियोजनापैकी सुमारे ५१३ कोटींचा निधी देण्यात येणार आहे. ७५ स्मारकांच्या ठिकाणी जन सुविधा निर्माण करण्याचे कार्यही हाती घेण्यात आले असून त्यासाठी ६५ कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. शौचालये बांधण्यासाठी सुलभ इंटरनॅशनलला तीस वर्षांचे कंत्राट देण्यात येणार आहे. सर्व ३८७ स्मारकांवर त्यांची माहिती क्यूआर कोडच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. किल्ल्यांवरील अतिक्रमणेही दूर करण्यात येत आहेत, असे मुनगंटीवार म्हणाले.
राजगुरू स्मारकाचा आराखडा २ महिन्यांत हुतात्मा शिवराम हरी राजगुरू यांचे देशाच्या स्वातंत्र्यलढ्यातील योगदान मोठे आहे. त्यांच्या स्मारकाबाबत शासन पुढाकार घेऊन काम करीत आहे. या स्मारकाबाबत आराखडा तयार करण्यात आला होता. त्या आराखड्याच्या किमतीत आता वाढ झाली आहे. या स्मारकाबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींची समिती तयार करण्यात येईल. त्यात आमदारांच्या सूचनांचा अंतर्भाव करून दोन महिन्यांत अंतिम आराखडा तयार करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.