आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी माहीम कोळीवाडा येथील शाखा क्रमांक 182 ला भेट देत शिवसैनिकांशी संवाद साधला. यावेळी आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांवर बरसले. 33 देशांनी यांच्या बंडखोरीची नाही तर गद्दारीची नोंद घेतली आहे, अशा शब्दांत आदित्य ठाकरे यांनी तोफ डागली. दरम्यान, शिवसैनिकांशी संवाद साधल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी जॉगिंग ट्रॅकचं उद्घाटन केलं.
यावेळी आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांना उपहासात्मक टोले लगावले. ठाकरे म्हणाले, जे फुटायचे होते ते फुटले, आता कोणी नाही फुटणार. नवीन लोकांना संधी देणार. गरजेपेक्षा जास्त दिलं त्याचं अपचन झालं म्हणून हाजमोला खाण्यासाठी ते तिकडे गेले. महाराष्ट्रात चांगलं सुरू होतं, हे बघवलं नाही म्हणून फुटले. उद्धव साहेबांसारख्या माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला. कोरोना काळात चांगलं काम केलं. जातीय वाद झाले नाहीत, महाराष्ट्र पुढे जात होता. विरोधकांनी त्याला अडवायला सुरुवात केली.
बंडखोर गद्दारच
आदित्य ठाकरे म्हणाले, काही बंडखोर म्हणतात, क्रांती केली. 33 देशांनी क्रांतीची नोंद घेतली म्हणतात. 33 देशांनी गद्दारीची नोंद घेतली, बंडखोरीची नाही. बंड करायचं होतं, क्रांती करायची होती तर महाराष्ट्रात राहून करायची होती. गुवाहाटीला गेले. झाडी, डोंगर बघत होते. तिथे आसामला पूर आला होता. पण, हे ट्रॅक पॅन्ट, टीशर्ट घालून मजा करत होते. बाळासाहेब ठाकरे यांचे शिवसैनिक असते तर त्यांनी पाण्यात उतरून तिथे मदत केली असती. त्यानंतर गोव्यात आले. उद्धवसाहेब यांनी राजीनामा दिला तेव्हा हे गोव्यात टेबलावर नाचत होते. बारमध्ये नाचतात तसं. त्यानंतर त्यांना गोव्यातून फरफटून महाराष्ट्रात आणलं. हे जरी बंडखोरी म्हणत असले तरी हे गद्दार म्हणजे गद्दार राहणारच, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
असे राज्यपाल पाहिले नाही
आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यपाल यांनी महात्मा फुलेंविषयी वक्तव्य केलं होतं. नुकतंच त्यांनी मुंबई ठाणे बद्दल वक्तव्य केलं. मी बरेच राज्यपाल पाहिले पण असे राज्यपाल पाहिले नाही. पी. अलेक्झांडरपासून आतापर्यंत अनेक राज्यपाल झाले. पण असे, राज्यपाल बघितले नाही.
हजारो कोटींचे उद्योग आणले
ठाकरे म्हणाले, सरकार असताना आम्ही हजारो कोटींचे उद्योग महाराष्ट्रात आणले. उद्धव ठाकरे साहेबांनी कोरोना काळात चांगलं काम केलं. आज आपलं सरकार असतं तर माहीम किल्ला पर्यटनासाठी खुला करून रोजगार उपलब्ध केला असता. उद्या बेस्टला 75 वर्ष होताहेत. आपण बेस्टचं तिकीट कमी केलं. 5 किलोमीटर 5 रुपयांत प्रवास असं आपण केलं.
गद्दारांबद्दल राग नाही
आदित्य ठाकरे पुढे म्हणाले, गद्दारी केल्यानंतर काय काय कारणं दिली; एक कारण दिलं वार्ड ऑफिस सहकार्य करत नाही. स्थायी समिती अध्यक्ष राहिलेल्या माणसाला वार्ड ऑफिसर ऐकत नाही. एकजणाने तर कोण आदित्य ओळखत नाही, असं वक्तव्य केलं. हो मी साधा आमदार आहे, मी एक सच्चा शिवसैनिक आहे. काहीजण सांगतात उद्धव ठाकरे यांच्यावर प्रेम आहे. आदित्य आम्हाला मुलासारखा आहे. पण दुसरा येतो आणि टीका करून जातो. या गद्दारांबद्दल माझ्या मनात राग नाही; पण मनात वाईट वाटतंय.
सरकार पडणार
यावेळी आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला. राज्यातील बेकायदेशीर सरकार आहे. जम्बो मंत्रिमंडळ आहे. पण काही निर्णय घ्यायचा असेल दिल्लीवारी करतात. हे सरकार पडणार म्हणजे पडणारच. नेमका मुख्यमंत्री कोण आहे? माईक काय काढून घेतात, चिठ्ठी काय देतातहे आधी कधी झालं नव्हतं. हे सरकारच बेकायदेशीर आहे आणि हे सरकार पडणार म्हणजे पडणारच, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.