आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा निर्णय:सत्ताधारी, विरोधक नेत्यांच्या 32 साखर कारखान्यांना 391 कोटींची थकहमी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अशोक चव्हाण, पंकजा मुंडे, दानवे, विखे यांचेही कारखाने

आर्थिक अडचणीत आलेल्या ३२ साखर कारखान्यांना यंदाच्या ऊस गाळप हंगामासाठीच्या अल्प मुदत कर्जास राज्य सरकारने मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत ३९१ कोटींची थकहमी देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये सत्ताधारी आघाडीच्या नेत्यांबरोबरच विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या कारखान्यांचाही समावेश आहे. राज्याच्या सहकार विभागाकडे ३७ साखर कारखान्यांनी थकहमी मिळण्यासाठी प्रस्ताव पाठवले हाेते. त्यांच्या थकहमीची रक्कम ७५० कोटी होती. राज्य सहकारी बँकेने साखर कारखान्यांना कर्ज देण्यासाठी सध्या हात आखडता घेतला आहे. थकहमी मिळाली नसती तर या कारखान्यांचा गाळप हंगाम अडचणीत अाला असता. सहकार विभागाने यंदा प्रथमच थकहमीस पात्र ठरण्यासाठी ५ निकष बनवले होते. तसेच गाळप सुरू होताच प्रत्येक साखर पोत्याला २५० रुपयांचे टॅगिंग करून कर्ज वसूल करण्यास बँकांना सरकारकडून मुभा देण्यात आली आहे.

८१५ लाख टन गाळप अपेक्षित :

१५ आॅक्टोबरपासून गाळप हंगाम सुरू होत आहे. १० लाख ६६ हजार हेक्टर क्षेत्रावर ऊस उभा आहे. ८१५ लाख टन ऊसाचे गाळप करणे अपेक्षित आहे. सर्व कारखाने सुरू झाल्यास सर्व उसाचे गाळप शक्य होणार आहे, म्हणून थकहमीचा आग्रह होता, तो मान्य झाला, अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

अशोक चव्हाण, पंकजा मुंडे, दानवे, विखे यांचेही कारखाने

सत्ताधारी आघाडीतील काँग्रेसचे अशोक चव्हाण, शिवसेनेचे चंद्रदीप नरके, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रकाश सोळंके त्याबरोबरच रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, विजयसिंह मोहिते पाटील, हर्षवर्धन पाटील, राधाकृष्ण विखे पाटील, कल्याण काळे, धनंजय महाडिक, मदन भोसले आदी भाजपच्या नेत्यांच्या कारखान्यांना थकहमी दिली आहे.