आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिंदेंचा बीकेसीवरील मेळावा फेल:मोदींच्या रेल्वे मंत्रालयात 4 लाख डॉलरची लाच; सीबीआयतर्फे चौकशी करा- महेश तपासे

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

'ना खाऊंगा ना खाने दूंगा' असं घोषवाक्य घेत सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदींच्या रेल्वे मंत्रालयात कंत्राट मिळवण्यासाठी चार लाख डॉलरची लाच ओरायकल कंपनीने दिल्याप्रकरणी 23 मिलियन डॉलरचा दंड युनायटेड स्टेट्स सिक्युरिटी ॲंड एक्स्चेंज कमिशनने कंपनीला ठोठावला असून याप्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी आज पत्रकार परिषदेत केली.

केंद्राने भूमिका जाहीर करावी

तपासे म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी देशात सत्ता स्थापन केल्यानंतर त्यांच्याच राजवटीत ओरायकल कंपनीच्या माध्यमातून भारतीय रेल्वे अंतर्गत कंत्राट मिळण्यासाठी जवळपास चार लाख डॉलरची लाच देण्यात आली याचा खुलासा झाला असून जेव्हा हा भ्रष्टाचार झाला त्यावेळी रेल्वे मंत्रालय पियुष गोयल यांच्याकडे होते. मात्र एवढ्या मोठ्या भ्रष्टाचारावर रेल्वे मंत्रालयाने किंवा भारत सरकारने अद्याप भूमिका स्पष्ट केली नाही त्यामुळे या चार लाख डॉलरचा भ्रष्टाचार करुन ज्यांनी कंत्राट दिले त्यांची चौकशी करुन जनतेसमोर उभे केले पाहिजे. दरम्यान या भ्रष्टाचारासंदर्भातील भूमिका पियुष गोयल यांनी स्पष्ट करावी अशी मागणीही महेश तपासे यांनी केली आहे.

बीकेसीवरील मेळावा फेल

तपासेंनी टीका केली की, काल एकनाथ शिंदे यांचा दसरा मेळावा बीकेसी मैदानावर झाला. वास्तविक राज्यातील जनतेची खूप अपेक्षा होती की, राज्याचे मुख्यमंत्री राज्याला संबोधन करतात, तेव्हा राज्याच्या हिताच्या योजना किंवा धोरण मांडतील परंतु योजना मिळणं दूर मुख्यमंत्र्यांना भाषणात धोरणही जाहीर करता आलं नाही त्यामुळेच त्यांचा हा मेळावा फेल झाला आहे.या मेळाव्याला आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील व्यक्तीला बोलावलं असतं तर महाराष्ट्राला आधार मिळाला असता परंतु चंपा थापाला बोलावून आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील सदस्यांचा एकप्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अपमान केला आहे.

टीकेतून दुजाभाव नको

एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि कॉंग्रेसवर टिका केली. त्यांनी जरुर टिका करावी परंतु अडीच वर्षे महाविकास आघाडीचे सरकार असताना हेच एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या शेजारी बसलेले जनतेने पाहिले आहे आणि त्याकाळात मुंबई व महाराष्ट्राच्या हितासाठी घेतलेल्या सर्व निर्णयामध्ये शिंदे सहभागी होते. त्यामुळे आज टिकेतून दुजाभाव करण्यात आला ही गोष्ट बोलणं योग्य नाही.

चिठ्ठी भिजली असती तर..

तपासे म्हणाले, ज्या पद्धतीचे भाषण एकनाथ शिंदे करत होते. समजा काल पाऊस आला असता तर हातासमोरील चिठ्ठी भिजली असती तर नेमकं पुढे काय बोलावं हे सुचलं नसतं. परमेश्वराला पाऊस न पाडल्याबद्दल लाख आभार मानायला हवे.

राजकारणात असताना आणि मुख्यमंत्री म्हणून काम करताना राज्यातील जनतेच्या फार मोठ्या अपेक्षा एकनाथ शिंदे यांच्याकडून होत्या मात्र या सर्व अपेक्षा फोल ठरल्या आहेत. कुठलीही नवीन योजना मोठा मेळावा घेऊनही मांडू शकले नाहीत वैचारिक दिवाळखोरपणा या सरकारचा आहे का अशी शंका महाराष्ट्रातील जनतेच्या मनात निर्माण झाली आहे असा थेट हल्लाबोल महेश तपासे यांनी यावेळी केला.

बातम्या आणखी आहेत...