आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विमा संरक्षण:सर्वच कोरोना वॉरियर कर्मचाऱ्यांना 50 लाखांच्या विम्याचे संरक्षण; उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • आदिवासी भागातील बाँडेड व एमबीबीएस डॉक्टरांच्या मानधनात 15 हजारांनी वाढ

कोरोना साथप्रतिबंधक व उपचार कार्याशी संबंधित कर्तव्ये पार पाडणाऱ्या शासकीय, खासगी, कंत्राटी, बाह्यस्रोतांद्वारे घेतलेले कर्मचारी, मानसेवी, तदर्थ कर्मचारी अशा सर्व कर्मचाऱ्यांना ५० लाख रुपयांचे विमा संरक्षण पुरवण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

विमा संरक्षणाची कार्यवाही अंतिम होईपर्यंतच्या कालावधीत कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाल्यास कुटुंबीयांना राज्य शासनाकडून ५० लाख रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी दिली. यासंबंधीचा शासननिर्णय वित्त विभागातर्फे जारी केल्याचेही त्यांनी सांगितले. ही योजना तूर्तास ३० सप्टेंबर २०२० पर्यंत लागू असेल.

या नियम व अटी : संबंधित कर्मचारी कोरोनामुळे रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी किंवा दुर्दैवाने मृत्यू होण्यापूर्वीच्या १४ दिवसांच्या कालावधीत कर्तव्यावर हजर असणे व जिल्हाधिकारी किंवा विभागप्रमुखांनी ते प्रमाणित करणे अनिवार्य आहे. अशाच प्रकारची योजना स्थानिक स्वराज संस्था आणि राज्य शासकीय सार्वजनिक उपक्रमांकडून देखील राबविण्यात येणार आहे.

पोलिस, होमगार्ड, अंगणवाडीसह सर्व कर्मचाऱ्यांचा समावेश

कोविडविरुद्धच्या लढ्यात सहभागी असलेले जिल्हा प्रशासन, पोलिस, होमगार्ड, अंगणवाडी कर्मचारी, लेखा व कोषागारे, अन्न व नागरी पुरवठा, पाणी पुरवठा व स्वच्छता, घरोघरी सर्वेक्षणासाठी नेमलेले अन्य विभागांचे कर्मचारी (रोजंदारी, कंत्राटी, बाह्यसेवेद्वारे घेतलेले, मानसेवी व तदर्थ असे सर्व) अशा सर्व घटकांना ५० लाख रुपयांच्या विमा संरक्षणाचा लाभ मिळणार आहे.

आदिवासी भागातील बाँडेड व एमबीबीएस डॉक्टरांच्या मानधनात 15 हजारांनी वाढ

मुंबई | कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या राज्यातील सर्व डॉक्टरांच्या मानधनात १५ हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वतः याची घोषणा करत बंधपत्रित (बाँडेड) डॉक्टर्सच्या मानधनात वाढीसह कंत्राटी डॉक्टर्सचे आणि त्यांचे मानधन समान करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. 

आदिवासी भागातील बंधपत्रित डॉक्टरांना मिळणारे मानधन १५ हजारांनी वाढवून ७५ हजार झाले. आदिवासी भागातील बंधपत्रित विशेषज्ञ डॉक्टरांना ८५ हजार मानधन मिळेल. इतर भागातील एमबीबीएस डॉक्टरांचेही मानधन ५५ हजारांवरून ७० हजार आणि इतर भागातील विशेषज्ञ डॉक्टरचे मानधन ६५ हजारांवरून ८० हजार करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...