आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुंबईकरांसाठी एक गोड बातमी देत आहोत, मुंबईतील 500 चौरस फुटांपर्यंतच्या घरांचा मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय घेऊन आम्ही कष्टकरी मुंबईकरांच्या ऋणातून उतराई होण्याचा प्रयत्न केला आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.
आज नगरविकास विभागाच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. मुंबईत 16 लाखापेक्षा जास्त घरे 500 चौ. फुटांपेक्षा कमी असून त्यात राहणाऱ्या लाखो कुटुंबांना या निर्णयाचा फायदा मिळणार आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे?
राज्यातील सर्वांनाच नव्या वर्षाच्या शुभेच्छा देऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, 2017 ला निवडणुकीत शिवसेनेने जे वचन दिले ते पूर्ण करण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, यातील बहुतांश वचने पूर्ण केली असून आज आणखी एक महत्त्वाचे वचन या निर्णयाने पूर्ण होत आहे.
मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे. 1966 पासून जन्माला आलेली शिवसेना ही अडीअडचणीच्या काळात नेहमी मुंबईकरांच्या मदतीला धावून गेली आहे. शिवसेनाप्रमुख स्वत: मुंबईतील कामांची पहाणी करत असत. मी सुद्धा पूर्वीपासून पालिकेची जी कामे सुरू आहेत तिथे आवर्जून पाहणीसाठी जायचो, मग ते नालेसफाई, दहिसर नदीचे काम असेल किंवा सौंदर्यीकरणाचे काम असेल. आता स्वतः आदित्य ठाकरे दिवसरात्र पालिकेचे अधिकारी, नगरसेवक यांच्यासमवेत जाऊन या कामांची पाहणी करतात. सुविधा देतांना आपल्याला मुंबईकरांना दिलासाही द्यायचा आहे. मुंबईकर म्हणजे नुसते कर भरणारे नाही. दोन्ही हाताने सगळ्यांना पैसा देणारा हा मुंबईकर राज्याच्या विकास कामांमध्ये मोलाचे योगदान देतो. पण त्याला परत काय मिळतं हा खरा प्रश्न आहे.
कष्टकऱ्यांच्या घामातून ही मुंबई उभारली आहे हे आम्ही विसरता कामा नये. आणि म्हणूनच शिवसेनेने मुंबईकरांसाठी फक्त जाहीरनामे दिले नाहीत तर वचने दिली आणि जी कामे करता येतात त्यांचीच आश्वासने दिली आहेत. शिवसेनाप्रमुखांनी आखून दिलेली परंपरा शिवसेना जपते. जे काम जमणार असेल तेच वचन द्यायचे, जे जमणार नाही अशी खोटे वचने द्यायची नाहीत, त्यांची हीच परंपरा आपण पुढे नेत आहोत असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, मतदानापूर्वी तारे तोडून आणण्याची भाषा करणारे नंतर पाच वर्षे काहीच बोलत नाहीत. आम्ही हे असे अजिबात करत नाहीत. आता शिवसेनेसोबत आणखी काही मित्र आले आहेत. मग राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल.
500 चौ. फुटापर्यंतच्या घराच्या मालमत्ताकर माफ करणे हे महत्वाचे वचन आपण आज पूर्ण करत आहोत. हा निर्णय घेण्यासाठी ज्यांनी सहकार्य केले त्यांना सर्वांना मुंबईकरांच्यावतीने धन्यवाद देतो असेही मुख्यमंत्री म्हणाले.
सर्वात मोठी भेट – एकनाथ शिंदे
मुंबईकरांचा 500 चौरस फुटापर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ केल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळणार असून 16 लाख कुटुंबांना लाभ होणार आहे. अशा स्वरूपाचा मोठा निर्णय देशात कुठल्याही पालिकेने घेतला नसेल. मुंबईकरांसाठी महत्त्वाकांक्षी आणि क्रांतीकारी निर्णय असून नवीन वर्षाचं मोठी भेट आहे असे सांगून नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, मुख्यमंत्र्यांच्या मनात मुंबईकरांसाठी तळमळ असून रुग्णालयात असूनही कोविड रोखण्यासाठीचे काम आणि इतर कामांच्या प्रगतीविषयी मुख्यमंत्री वारंवार विचारायचे. शिवसेना दिलेल्या वचनाला जागते, दिलेला शब्द पाळते. कोविड काळात देखील विकास कामांना कात्री लावली नाही असेही ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.