आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान लवकरच; मुख्यमंत्र्यांचा शब्द : राजू शेट्टी

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सन २०१९ च्या शासन निर्णयाप्रमाणे राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा विषय मंत्रिमंडळ बैठकीत आणला जाईल, नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये प्रोत्साहन अनुदान लवकरच दिले जाईल तसेच पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याबाबत शासन सकारात्मक असल्याचा शब्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी सोमवारी दिली. दरम्यान, आजच्या बैठकीतील मागण्यांवर मुख्यमंत्री काय निर्णय घेतात ते आम्ही पाहू. जर मुख्यमंत्र्यांनी शब्द पाळला नाही, तर स्वाभिमानी संघटना पूरग्रस्तांचे आक्रोश आंदोलन पुन्हा सुरू करेल, असा इशारा देऊन आंदोलन मागे घेण्याचा मुख्यमंत्र्यांना शब्द दिलेला नाही, असे शेट्टी यांनी स्पष्ट केले. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाची सोमवारी दुपारी तीन वाजता सह्याद्री अतिथिगृहावर मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक झाली. त्यानंतर शेट्टी यांनी माध्यमांना बैठकीतील चर्चेची माहिती दिली. बैठकीला महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, मुख्य सचिव सीताराम कुंटे होते. त्यानंतर शेट्टी बोलत होते.

- राज्यातील पूरस्थितीवर कायमस्वरुपी उपाययोजना करण्याबाबत तज्ञ आणि यंत्रणांशी समन्वय साधण्यात येत आहे. - सन २०१९ यावर्षी शासनाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधीपेक्षा वाढीव दराने जी मदत केली आहे. त्याच धर्तीवर आताही मदत करण्यात येईल. - जुलै महिन्यातील अचानक आलेल्या पूरस्थितीमुळे शेतकऱयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांची खरीप हंगामातील पिकांसाठी काढलेली पीक कर्जाचे पुनर्गठन करण्याबाबत रिझर्व्ह बँकेशी याबाबत चर्चा करण्यात येईल. रोजगार हमीच्या माध्यमातून पूरग्रस्त भागात कामांना प्राधान्य.

राज्यपाल नियुक्त सदस्यप्रकरणी चर्चा नाही
विधान परिषदेवर राज्यपाल नामनियुक्त सदस्य म्हणून पाठवायच्या १२ सदस्यांच्या यादीवर बैठकीत चर्चा झाली नाही, असा दावा शेट्टी यांनी केला. पूरग्रस्तांना मदतनिधी देण्यावर केंद्र सरकार गुजरात आणि महाराष्ट्राला भिन्न वागणूक देत असून केंद्राच्या सापत्न वागणुकीविषयी राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री भूमिका घेणार असतील तर आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असे शेट्टी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...