आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुद्दा अस्मितेचा, आंदोलन कुरघोडीचे:‘राज्यपाल हटाव’साठी आज मविआचा मोर्चा, 'माफी मागा' म्हणत उद्धवसेनेविरोधात भाजपची निदर्शने

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिंदेसेनेचाही कल्याण-डोंबिवलीत बंद; एक लाख मोर्चेकरी येणार, आघाडीच्या नेत्यांचा दावा

महापुरुषांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी व इतर भाजप नेत्यांविरोधात महाराष्ट्र विकास आघाडी शनिवारी मुंबईत महामोर्चा काढणार आहे. यात १ लाख लोक सहभागी होतील, असा आघाडीचा दावा आहेे. भायखळा ते सीएसएमटी असे ५.३० किमी अंतर मोर्चेकरी चालणार आहेत. सरकारने १४ अटींसह मोर्चाला परवानगी दिली. दुसरीकडे डॉ. आंबेडकर व देवदेवतांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारे खा. संजय राऊत, सुषमा अंधारे यांच्याविरोधात भाजप नेते मुंबईतील ६ लोकसभा मतदारसंघांत माफी मांगो आंदोलन करणार आहेत. एकूणच महाराष्ट्राच्या अस्मितेच्या मुद्द्यावर दोन्ही पक्षांकडून कुरघोडीचे राजकारण तापवले जात आहे.

मविआचे टार्गेट

  • महापुरुषांचा अवमान, सीमाप्रश्नी होणारी गळचेपी याविरोधात मविआ नेते सरकारला जाब विचारणार.
  • कोश्यारी, चंद्रकांत पाटील त्यांचे टार्गेट असतील. पण भाजप नेत्यांनी दोघांचीही पाठराखण केली आहे.
  • सर्व महाराष्ट्रप्रेमींनी या माेर्चात सहभागी होण्याचे भावनिक आवाहन मविआ नेत्यांनी केले आहे.
  • मविआविरोधात भाजपचे आंदोलन म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा : काँग्रेस

भाजपचे टार्गेट

  • संजय राऊत, सुषमा अंधारे या भाजपच्या टार्गेट आहेत. वारकरी मंडळीही आंदोलनात उतरली आहे.
  • देवता, बाबासाहेबांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये होत असताना उद्धव गप्प का, असा प्रश्न आशिष शेलारांनी केला.
  • बाबासाहेब महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत म्हणण्यात गैर काय, असे प्रत्युत्तर संजय राऊतांनी दिले आहे
  • माझ्यामुळे पक्ष अडचणीत येत असेल तर राजीनाम्यास तयार : सुषमा अंधारे

मोर्चात २५ पक्ष -संघटना
समाजवादी पक्ष, सीपीआय, सीपीएम, लाल निशाण पक्ष, शेकाप, मराठा क्रांती ठोक मोर्चा, रिपाइंचा निकाळजे गट अशा २५ पक्ष-संघटनांनी मोर्चाला पाठिंबा दिल्याचा आघाडीचा दावा आहेे.

दिव्य मराठी एक्सप्लेनर
राज्यपाल बदल अटळ, आघाडीला श्रेय नको म्हणून भाजपचा प्रतिडाव
महापुरुषांबद्दल सातत्याने अवमानकारक वक्तव्ये करणाऱ्या राज्यपाल कोश्यारींविरोधात वातावरण तापत आहे. पुणे, सोलापूर बंदला प्रतिसाद मिळाल्याने भाजपच्या गोटात अस्वस्थता आहे. त्यातच चंद्रकांत पाटील, आशिष शेलार, राम कदम यांनीही यांनीही बेताल वक्तव्ये करून भाजपच्या अडचणींत वाढ केली. महाविकास आघाडीने या अस्मितेच्या मुद्द्याचे राजकारण करत सरकारची कोंडी केली आहे. आता राज्यपाल बदलणे हाच पर्याय सत्ताधाऱ्यांकडे आहे. पण त्याचे श्रेय विरोधकांना मिळू नये याची खबरदारी घेतली जात आहे. म्हणूनच मविआच्या मोर्चाला प्रत्युत्तर म्हणून भाजपने प्रतिआंदोलनाचा डाव टाकला. शिंदेसेनेने बंद पुकारून परजिल्ह्यातून येणाऱ्या मविआच्या आंदोलकांची कोंडी करण्याची रणनीती आखली आहे. हिवाळी अधिवेशनातही हा मुद्दा गाजणार यात शंकाच नाही. त्यात विरोधकांच्या हल्ल्यापासून बचावासाठी भाजपने मविआविरोधी आंदोलनाची ढाल आतापासूनच पुढे केलेली दिसते.

बातम्या आणखी आहेत...