आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेचा 55 वा वर्धापन दिन:राज्यात जनता अस्वस्थ असताना स्वबळाचे नारे नको : उद्धव ठाकरे

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 'स्वबळ हे फक्त निवडणुकांपुरतेच नको'

जे राजकीय पक्ष कोरोना काळातही स्वबळाचा नारा देत आहेत, त्यांना मला सांगायचे आहे की, “स्वबळ हे फक्त निवडणुकांपुरतेच नसते. न्याय्य हक्क मागण्यांसाठीदेखील स्वबळ लागते. नाहीतर अन्याय होत असतानाही बळच नसेल, तर वार कसा करणार? लाेक अस्वस्थ असताना स्वबळाचे नारे दिले तर लाेक जोड्याने मारतील, असे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला शनिवारी अप्रत्यक्षरीत्या सुनावले. शिवसेनेच्या ५५ व्या वर्धापनदिनी ठाकरे यांनी पक्ष कार्यकर्त्यांशी ऑनलाइन संवाद साधला.

ठाकरे म्हणाले, अनेक राजकीय पक्ष कोरोना काळातही स्वबळाचा नारा देत आहेत. आपणही स्वबळाचा नारा देऊ. स्वबळ तर असायलाच हवे. ताकद तर कमवावीच लागते. पण ती कशी? माझे आजोबा आणि शिवसेनाप्रमुख सांगायचे की स्वत:चे बळ आणि आत्मविश्वास असायला हवा. जर आत्मविश्वास नसेल तर तू काहीही करू शकणार नाहीस आणि आत्मविश्वास असेल तर जगाच्या पाठीवर तुला कुठेही मरण नाही. आत्मबळ आणि स्वबळ हेच तर शिवसेनेने दिले.

उद्धव ठाकरे म्हणाले, सेनेची स्थापना झाली, तेव्हा मुंबई, महाराष्ट्रात मराठी माणूस क्षुल्लक गोष्ट होती. मराठी माणसाला अपमानित बनून जगावे लागत होते. तेव्हा शिवसेनाप्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली नसती तर आज महाराष्ट्रात आणि मुंबईत मराठी माणसाची जी अवहेलना झाली असती ती विचारता सोय नाही,’ असेही ठाकरे म्हणाले.

भाजपला राजकीय औषध देणार : या वेळी भाजपला टोला लगावताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “भारतीय जनता पक्ष हा सत्तेसाठी कासावीस झालेला आहे. त्यांना सत्तेची पोटदुखी झालेली आहे. त्यांना मीच राजकीय औषध देणार आहे. शिवसैनिक कधीही रक्तपात करणार नाही.’
स्वबळ म्हणजे काय?
कोरोना काळातही अनेक पक्ष स्वबळाचा नारा देत आहेत. तो आपणही देऊ. ताकद तर कमावलीच पाहिजे. पण स्वबळ म्हणजे काय? स्वबळ केवळ निवडणुका लढवण्यापुरते असू नये. निवडणुका येतात आणि जातात. स्वबळ हे अभिमानाचे, स्वाभिमानाचे असावे. आम्हीही स्वबळाचा नारा देऊ. स्वबळावर लढणं हा आमचा हक्क आहे.

आधी तलवार उचलण्याची ताकद कमवा
अन्यायाविरुद्ध वार करायचा. पण बळच नाही आणि वार कसले करताय? आधी तलवार उचलण्याची ताकद कमवावी आणि मग वार करावा. स्वबळाचा अर्थ माझ्यासाठी तो आहे. निवडणुका येतात निवडणुका जातात. जय- पराजय होत असतो, असा टोलाही त्यांनी या वेळी लगावला.

हे तर गँगप्रमुखाचे भाषण -मुनगंटीवार

शिवसेनेच्या वर्धापनदिनी उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला. यावर पलटवार करत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, वर्धापन दिनाचे उद्धव ठाकरे यांचे भाषण म्हणजे सत्ताप्रमुखाचे नव्हे तर गँगप्रमुखाचे भाषण आहे. दोन दिवसाआधी आपण गुंड आहोत, म्हणून शिवसेनेने सांगितले. आता काँग्रेसला स्वबळाच्या नाऱ्यामुळे जोड्याने मारण्याची भाषा केली जात आहे. हिंदुत्वाची व्याख्या भारताला आधीच कळली आहे, तुम्ही सांगण्याची गरज नाही. मात्र, शेवटी शिवसेनेची त्यातील भूमिका कोणती आहे, असा सवाल मुनगंटीवार यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...