आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:... तर 60 वा मराठा क्रांती मोर्चा रोह्यातून, कोपर्डीप्रमाणे रोहा बलात्कारप्रकरणी ठिणगीची शक्यता; काय घडले रोह्यात?

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • क्रांती मोर्चांंसाठी भाजपची फूस, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांचा आरोप

रोह्यातील अल्पवयीन मुलीवरील अत्याचारप्रकरणी २४ सप्टेंबरपर्यंत आरोपपत्र दाखल न झाल्यास २६ सप्टेंबरला महाराष्ट्रातील ६० वा मराठा क्रांती मोर्चा रोह्यातून निघेल, असा इशारा मोर्चाचे एक समन्वयक राजन घाग यांनी दिला आहे. एकीकडे मराठा आरक्षणाचा प्रश्न सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असताना आता क्रांती मोर्चे सुरू झाल्यास कोरोना उपाययोजना व सुशांतसिंह आत्महत्याप्रकरणी कोंडीत सापडलेल्या महाविकास आघाडी सरकारसाठी डोकेदुखी ठरेल. नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथील अत्याचाराच्या घटनेनंतर सन २०१६ मध्ये राज्यभरात प्रत्येक जिल्ह्यात लाखा-लाखाचे मराठा क्रांती मोर्चे निघाले होते. आता रायगड जिल्ह्याच्या रोह्यातील अत्याचार व हत्या प्रकरणाने ठिणगी पडण्याची शक्यता आहे. क्रांती मोर्चाच्या २२ जिल्ह्यांत समन्वय समित्या आहेत. या समित्यांची ३० जुलै रोजी बैठक झाली होती. ९ आॅगस्टच्या क्रांतिदिनी मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावर आंदोलनाचा निर्णय बैठकीत झाला होता. त्यानुसार रविवारी पुण्यात जागरण गोंधळ करून आंदोलन केले. जातीय अत्याचार प्रतिबंधक कायदा (अॅट्राॅसिटी अॅक्ट) पातळ करण्यासाठी तत्कालीन फडणवीस सरकारची मराठा क्रांती मोर्चांना फूस असल्याचा आरोप झाला होता. या वेळी क्रांती मोर्चे निघाल्यास ठाकरे सरकारला ते हाताळणे अवघड ठरणार आहे.

काय घडले रोह्यात ? :

रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यात तांबडी या गावी २६ जुलै रोजी एका १४ वर्षांच्या मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी रायगड पोलिसांनी २७ जुलै रोजी एका नराधमास अटक केली होती. याप्रकरणी अद्याप आरोपपत्र दाखल झालेले नाही. २४ सप्टेंबर रोजी ९० दिवस पूर्ण होत आहेत.

मंत्री अशोक चव्हाण निशाण्यावर

क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी मराठा आरक्षण मंत्री उपसमितीचे अध्यक्ष व काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांच्याविरोधात आघाडी उघडली आहे. चव्हाण यांना बदलून मंत्री उपसमितीच्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार अथवा शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची वर्णी लावावी, अशी मोर्चेकऱ्यांची मागणी आहे.

क्रांती मोर्चांंसाठी भाजपची फूस

मराठा आरक्षण टिकेल व त्याचे श्रेय मविआ सरकारला मिळेल या भीतीने भाजप नेत्यांच्या पोटात दुखायला लागले आहे. त्यांच्याच इशाऱ्यावर आमदार मेटे यांच्याकडून क्रांती मोर्चे निघण्यासाठी प्रयत्न केला जात आहे, असा आरोप काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...