आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिढा सुटेना:राज्यात 60 मार्गांवर धावल्या 79 बसेस, आणखी 821 एसटी कर्मचारी कामावर, मंत्रालयासमोर कर्मचाऱ्यांचा आत्मदहनाचा प्रयत्न

मुंबई14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
एसटी बंदचा ६ वा दिवस व आंदोलनाचा तेरावा दिवस एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारच्या नावे मुंडण करून तेरावे घातले. रविवारी बालकदिनी कर्मचाऱ्यांची मुले आशय सचिन हाताळकर (३) आणि सौरभ संतोष राठोड यांनीही मुंडण करून निषेध नोंदवला. छाया : नीरज भांगे - Divya Marathi
एसटी बंदचा ६ वा दिवस व आंदोलनाचा तेरावा दिवस एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारच्या नावे मुंडण करून तेरावे घातले. रविवारी बालकदिनी कर्मचाऱ्यांची मुले आशय सचिन हाताळकर (३) आणि सौरभ संतोष राठोड यांनीही मुंडण करून निषेध नोंदवला. छाया : नीरज भांगे

आठवडाभरापेक्षाही जास्त कालावधीपासून राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे, परंतु आता कारवाईच्या भीतीने काही कर्मचारी कामावर परतायला लागले आहेत. रविवारी आणखी ८२१ कर्मचारी कामावर हजर झाले असून ६० मार्गांवर ७९ बसेस धावल्याचे एसटी महामंडळाने म्हटले आहे. मात्र त्यामध्ये चालक आणि वाहकांची संख्या अगदीच नगण्य असल्याने महामंडळाला एसटी सेवा पूर्ववत करणे मुश्कील झाले आहे.

जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रविवारी (ता.१४) मंत्रालयासमोर सकाळी ११ वाजता आंदोलन केले तसेच अंगावर राॅकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. हस्तक्षेप करत सहा आंदोलकांना मरीन ड्राइव्ह पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यामध्ये दोन पुरुष आणि चार महिलांचा समावेश आहे. गेल्या ६ दिवसांपासून आझाद मैदानात ठाण मांडून बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी मागण्या मान्य होईपर्यंत मैदान सोडणार नसल्याचा पवित्रा घेतला आहे. या कर्मचाऱ्यांनी आपल्या कुटुंबीयांनादेखील मुंबईत बोलावले असून कुटुंबासह आंदोलन सुरू केले आहे.

विलीनीकरणाच्या निर्णयासंदर्भात उच्च न्यायालयाच्या आदेशाने राज्य शासनाने समिती नेमली आहे. या समितीवर आमचा विश्वास नाही, अशी भूमिका संपकरी कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. त्यामुळे संप काही मिटण्याची चिन्हे नाहीत. दरम्यान, कर्मचाऱ्यांचे निलंबन मागे घ्यावे आणि विलीनीकरणाची मागणी मान्य करा, अन्यथा आम्ही हलणार नाही, अशी भूमिका आझाद मैदानातील आंदोलनाचे नेतृत्व करत असलेले भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी घेतली आहे.

६ दिवसांत नाशिक विभागास १० काेटींचा फटका
नाशिक | एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करा, या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी उपोषणाच्या माध्यमातून अघोषित संप सुरूच ठेवला आहे. या संपाला रविवारी ६ दिवस पूर्ण झाले. अद्यापही याबाबत काेणताही तोडगा काढण्यात शासनाला यश आलेले नाही. दुसरीकडे या संपामुळे विभागाचे साधारणत: १० काेटी रुपयांचे उत्पन्न बुडाले आहे. प्रवाशांनादेखील माेठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांना पाठिंबा देत रविवारी शिंगाडा तलाव येथील विभागीय कार्यालयासमाेर सिटू संघटनेने निदर्शने केली.

भाजपचे शेलार यांची आंदोलनस्थळी भेट
भाजपचे अॅड. आमदार आशिष शेलार यांनी रविवारी आझाद मैदानात उपोषणाला बसलेल्या एसटी कामगारांची भेट घेतली. इथला आवाज मंत्रालय आणि ‘मातोश्री’पर्यंत जायला पाहिजे, असे म्हणत त्यांनी आंदोलनास पाठिंबा दिला. ठाकरे सरकारचे दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे आहेत, असा आरोप शेलारांनी केला.

कर्मचाऱ्याचा हार्टफेल
हातकणंगले तालुक्यात एसटी बसवर दगडफेक झाली. त्यामध्ये चालक जखमी झाला आहे, तर कारवाईच्या भीतीने कोल्हापुरात एसटी कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू ओढवला. अनिल मारुती कांबळे असे मृत कर्मचाऱ्याचे नाव असून ते सावंतवाडी आगारात कार्यरत होते. पालघर येथील एसटी चालक दीपक खोरगडे (३०) याने घरातच विष घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी त्याला तेथीलच उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...