आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

खळबळजनक:मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियावर 80 हजार बोगस खाती; मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचा गौप्यस्फोट

मुंबई7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • थायलंड, तुर्की, इंडोनेशिया, जपान, सौदी येथून ही खाती उघडण्यात आली होती
  • महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या नेत्यांनी माफी मागावी : गृहमंत्री देशमुख

अभिनेता सुशांतसिंह आत्महत्या तपासप्रकरणी मुंबई पोलिसांची बदनामी करण्यासाठी सोशल मीडियावर ८० हजार बोगस खाती उघडण्यात आली होती, असा गौप्यस्फोट मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची मुंबई पोलिस चौकशी करणार असल्याचे त्यांनी मंगळवारी प्रसिद्धिमाध्यमांना सांगितले. दरम्यान, बोगस खाती उघडण्यामागे भाजपचा आयटी सेल असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.

थायलंड, तुर्की, इंडोनेशिया, जपान, सौदी येथून ही खाती उघडण्यात आली होती. शिव्या देणे, सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलिस काहीतरी लपवत असल्याचा दावा करणे, अफवा पसरवणे यासाठी या बोगस खात्यांचा वापर करण्यात आला होता, असे परमबीर सिंह म्हणाले. या प्रकरणाचा तपास करून दोषींवर कारवाई होईल, असे आयुक्तांनी सांगितले. मंगळवारी सायबर सेलने या संदर्भातील अहवाल पोलिस आयुक्त कार्यालयास सुपूर्द केला आहे.

राज्याचे नेतृत्व केलेल्या फडणवीसांनी महाराष्ट्राचा अवमान केला

मुंबई | अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या तपास प्रकरणाआड मुंबई पोलिस आणि महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम झाले असून याप्रकरणी आरोप करणाऱ्या नेत्यांनी महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत केली. या वेळी त्यांचा रोख भाजपवर होता.

ज्यांनी पाच वर्षे महाराष्ट्राचे नेतृत्व केले, मुंबई पोलिस, महाराष्ट्र पोलिसांचे नेतृत्व केले, त्या देवेंद्र फडणवीस यांनीही सुशांतसिंहप्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास योग्य दिशेने सुरू नसल्याचे म्हटले होते. फडणवीस यांनी मुंबई पोलिसांचा व राज्याचा अवमान केला आहे. ज्या पद्धतीने महाराष्ट्राला बदनाम करण्याचे काम काही पक्षांमार्फत झाले, मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचे काम झाले, असा आरोप त्यांनी केला.

दोन गुन्हे दाखल!

मुंबई पोलिसांची बदनामी केल्याप्रकरणी आयटी कायद्याअंतर्गत अनेक सोशल मीडिया अकाउंट आणि बनावट अकाउंटवर दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती मुंबई सायबर सेलच्या उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी दिली. मुंबई पोलिस आयुक्त व पोलिस दलाविरोधात अश्लाघ्य शब्दांचा वापर केल्याचा आरोप आहे.

बोगस खात्यांमागे भाजपचा आयटी सेल : राष्ट्रवादीचा आरोप

बोगस खाती उघडून मुंबई पोलिसांची बदनामी करण्यामागे भाजपचा आयटी सेल आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी केला आहे. खोटा प्रचार करण्यासाठी उघडलेली खाती हा आघाडी सरकार अस्थिर करण्याचा कट होता, असा आरोप शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी केला आहे. तर सोशल मीडियावरील बोगस खात्यांचा तपास अनेक नेत्यांपर्यंत जाऊ शकतो, आमचे सरकार त्याचे मूळ शोधेल, असा इशारा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिला आहे.

अॅनाटॉमी अँड रुमर : सोशल मीडियाचा पंचनामा

सुशांतच्या आत्महत्येसंदर्भात अमेरिकेतील मिशिगन विद्यापीठातील संशाेधकांनी अहवाल बनवला आहे. १४ पानांच्या या अहवालात १४ जून ते १३ सप्टेंबरपर्यंतच्या सोशल मीडियावरील भारतातील पोस्टच्या अभ्यासाचे निष्कर्ष नोंदवलेले आहेत. त्यानुसार रिपब्लिकसह काही टीव्ही चॅनल्स व भाजपने गैरप्रचार केल्याचा निष्कर्ष यात नमूद करण्यात आला आहे.

बिहार निवडणुकीच्या तोंडावर भाजप बॅकफूटवर

सुशांतसिंहची आत्महत्याच होती, असा अहवाल दिल्लीस्थित ‘एम्स’ने दिला आहे. हा अहवाल उघड होताच महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. त्यात आता याप्रकरणी सोशल मीडियावर ८० हजार बोगस खाती उघडल्याची माहिती मुंबई पाेलिसांनी पुढे आणली आहे. बिहार विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या बाबी उघड झाल्याने भाजप बॅकफूटवर गेला आहे.

पांडेंच्या प्रचाराला फडणवीस जाणार का?

बिहारचे निवृत्त पोलिस संचालक गुप्तेश्वर पांडे आता विधानसभा निवडणूक लढत आहेत. तर देवेंद्र फडणवीस बिहारचे पक्ष प्रभारी आहेत. महाराष्ट्र आणि मुंबई पोलिसांची बदनामी करणाऱ्या पांडेंच्या प्रचारासाठी देवेंद्र फडणवीस तिथे जाणार का, असा तिरकस सवाल देशमुख यांनी केला.

भाजपचा पलटवार :

मुंबई पोलिसांची बदनामी भाजपने नव्हे, आघाडीतील तिन्ही पक्षांच्या सरकारने केल्याचा दावा भाजप प्रवक्ते राम कदम यांनी केला. तर फडणवीस आणि भाजप कुठल्याही चौकशीला सामोरे जाण्यास तयार असल्याचे आमदार अतुल भातखळकर म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...