आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याच्या ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढते आहे. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत निर्बंध उठण्याची शक्यता नसून आणखी १५ ते २० दिवस शाळा बंदच राहतील, असे नि:संदिग्ध प्रतिपादन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले. महाराष्ट्रात लॉकडाऊनची गरज नाही, असे मुख्यमंत्री गुरुवारी पंतप्रधानांना सांगणार असल्याची माहितीही त्यांनी या वेळी दिली.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर टोपे यांनी प्रसिद्धिमाध्यमांशी संवाद साधला. सध्या घाबरण्यासारखी परिस्थिती नाही, पण काळजी घेणे गरजेचे आहे. शाळांच्या बाबतीत प्रदीर्घ चर्चा झाली. ग्रामीण भागात रुग्णांची संख्या वाढत आहे. अजून पुढील पंधरा-वीस दिवस शाळा बंद ठेवण्यात येतील. पुढे परिस्थितीवर लक्ष ठेवून मग शाळेच्या संदर्भात योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे टोपे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी त्यातील ८६ टक्के रुग्णांना सौम्य लक्षणे असून ते गृह विलगीकरणात आहेत. उर्वरित १४ टक्क्यांमध्येही केवळ २.८ टक्के रुग्ण गंभीर वर्गवारीत आहेत, असे ते म्हणाले.
स्कूल बसेसना दोन वर्षांचा संपूर्ण वाहन कर माफ शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या स्कूल बस वाहतूकदारांना कोविड संसर्गामुळे शाळा बंद असल्याने मोठा फटका बसला होता. त्यामुळे त्यांना दोन वर्ष वाहन करातून शंभर टक्के करमाफी देण्याचा निर्णय बुधवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. शाळांच्या मालकीच्या तसेच केवळ स्कूल बस म्हणून वापरात येणाऱ्या बसेस, शाळांनी कंत्राटी पद्धतीने घेतलेल्या तसेच केवळ शाळेतील मुलांना ने-आण करण्यासाठी शाळेव्यतिरिक्त इतरांच्या स्कूल बसेसना १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ या कालावधीसाठी वार्षिक करातून १०० टक्के करमाफी देण्यात आली आहे. लॉकडाऊन काळात बस बंद असताना कर का भरायचा, असा सवाल करत स्कूल बस ओनर्स असोसिएशनने वाहन करांतून करमाफी मिळावी, अशी मागणी केली होती.
राज्यात लसीचा तुटवडा राज्यात लसींचा तुटवडा असून गुरुवारी केंद्र सरकारकडे कोविशील्डचे ५० लाख, तर कोव्हॅक्सिनच्या ४० लाख अशा ९० लाख डोसची मागणी राज्याच्या वतीने करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गुरुवारी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी कोरोनासंदर्भात संवाद साधणार आहेत. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधानांकडे लसींची मागणी करणार आहेत. यासंदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनाही कल्पना देण्यात आली अाहे, असे टोपे म्हणाले.
१५ ते १८ वयोगटात ३५ टक्के लसीकरण राज्यात ९० टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. दुसरा डोस घेतलेले ६२ टक्के लोक आहेत. पण ही टक्केवारी देशाच्या सरासरीपेक्षा थोडी कमी आहे. गुरुवारी १५ ते १८ वयोगटाला लस देण्याचा टप्पा ३५ टक्के गाठला आहे. एकूण ६० लाखांपर्यंतचा हा वयोगट आहे. यामध्ये हाच वेग राहिला तर येत्या आठ ते दहा दिवसांत या वयोगटाचे लसीकरण पूर्ण होईल, असे टोपे यांनी सांगितले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.