आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीआर निघाला:बेळगावच्या 865 मराठी भाषिक गावांना आरोग्य योजनेचा फायदा, सीमावादाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नाचे घोंगडे अद्याप भिजतच पडले आहे. मात्र आता राज्य सरकारने सीमाभागातील ८६५ गावांना महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासंदर्भातला शासन निर्णय सोमवारी (३ एप्रिल) जारी करण्यात आला. यामुळे या ८६५ मराठी भाषिक गावांतील नागरिकांच्या आरोग्य समस्यांमध्ये मदत होणार आहे. बेळगाव, कारवार, कलबुर्गी आणि बिदर या चार जिल्ह्यांतील ही गावे आहेत.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाची न्यायालयात सुनावणी सुरू आहे. कर्नाटककडून सातत्याने सीमाभागातील मराठी भाषिकांवर अन्याय करण्यात येतो. यावरून राजकारणही सुरू असते. महाराष्ट्रातील जनतेला वैद्यकीय मदतीसाठी महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना राबवण्यात येते. ही योजना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेशी संलग्नित आहे. मात्र या योजनेचा लाभ महाराष्ट्राने दावा सांगितलेल्या ८६५ गावांतील मराठी भाषिक जनतेला होत नव्हता. यामुळे ही योजना सीमाभागातही लागू करण्याची मागणी स्थानिक मराठी बांधवांकडून होत होती. राज्य सरकारने या मागणीला आता मान्य केले आहे. दरम्यान, नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही याबाबत चर्चा उपस्थित करण्यात आला होता. त्यावर सरकारनेदेखील उत्तर देऊन या भागांत आम्ही सुविधा देऊ, असे सांगितले होते.

बेळगाव, कारवारसह चार जिल्ह्यांचा केला समावेश
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील महाराष्ट्राने दावा सांगितलेल्या बेळगाव, कारवार, कलबुर्गी आणि बिदर या चार जिल्ह्यांतील १२ तहसीलमधील ८६५ गावांतील मराठी भाषिक नागरिकांना या योजनेत आता समाविष्ट करण्यात आले आहे.