आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा विळखा:महाराष्ट्रातात कोरोनाग्रस्तांचा आकडा 1018 वर; राज्यात कोरोनाबाधित 150 नवीन रुग्णांची आज नोंद

मुंबई3 वर्षांपूर्वीलेखक: प्रवीण पवार
  • कॉपी लिंक
  • ‘मातोश्री’बाहेरील चहावाल्यास कोरोना, अहवाल आला पॉझिटिव्ह

राज्यात कोरोनाबाधित 150 नवीन रुग्णांची आज नोंद झाली. यामुळे राज्यातील रुग्ण संख्या 1018  झाली आहे. यामध्ये मुंबई 116,पुणे 18,अहमदनगर 3,बुलढाणा 2,ठाणे 2,नागपूर 3,सातारा 1,औरंगाबाद 3,रत्नागिरी 1, सांगली 01असा तपशील आहे.आतापर्यंत 79 कोरोनाबाधित रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. कोरोनाचा अजून एक रुग्ण रत्नागिरीत सापडला आहे. यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. आजपर्यंत रत्नागिरीतील हा तिसरा रुग्ण आहे. ही एक 52 वर्षीय महिला असून ती गृहिणी आहे.  औरंगाबादमध्ये आणखी तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यामध्ये मृत कोरोनाग्रस्ताच्या कुटुंबातील दोघांचा समावेश आहे. मृत व्यक्तीचा मुलगा आणि सूनेला कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. तर दुसऱ्या कोरोना पॉझिटिव्ह महिलेच्या 17 वर्षीय मुलीलाही विषाणूची लागण झाली आहे. दरम्यान पुण्यात कोरोनाबाधित असलेल्या तीन नागरिकांचा आज (मंगळवारी) सकाळी नऊ ते अकरा या वेळेत मृत्यू झाला. तिघांचेही वय 60 वर्षापुढील आहे. त्यापैकी दोघांना किडनी, मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास होता. यासोबत पुण्यातील मृतांचा आकडा आता 8 वर पोहोचला आहे. नागरिकांनी स्वत:ची आणि परिवाराची, आप्तांची काळजी घेणे महत्वाचे आहे.

एमपीएससीच्या परीक्षा अनिश्चित कालावधीसाठी पुढे ढकलण्यात आल्या आहेत 
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु असलेल्या प्रतिबंधनात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने 26 एप्रिल व 10 मे 2020 रोजी नियोजित राज्यसेवा पूर्व परीक्षा व राज्यसेवेच्या इतर परीक्षा सार्वजनिक हितास्तव पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या परीक्षांसंदर्भात सुधारित दिनांक संकेतस्थळावर घोषित करण्यात येणार आहे. 

गेल्या दोन दिवसांप्रमाणे राज्यात सोमवारीही कोरोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. राज्यात सोमवारी १२० नव्या रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्णांची संख्या ८६८ वर पोहोचली आहे. राज्यात ७ कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असून त्यापैकी ४ मुंबई आणि नवी मुंबई, ठाणे, वसई विरार येथील प्रत्येकी १ रुग्णाचा समावेश आहे. राज्यातील कोरोना बळींचा आकडा ५२ वर गेल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. एका अहवालानुसार राज्यातील कोरोना मृत्युदर ६.०१ टक्क्यांपर्यंत पोहोचला आहे. तो भारतच नव्हे, तर जगातील सरासरी मृत्यूदरापेक्षा जास्त आहे. 

‘मातोश्री’बाहेरील चहावाल्यास कोरोना, अहवाल आला पॉझिटिव्ह
> मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे निवासस्थान ‘मातोश्री’पासून काही फुटांवरच असलेल्या एका चहावाल्याला कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या संपूर्ण भागात प्रवेशबंदी केली आहे. 
> मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाहनचालकाला सुटी दिली असून ते स्वतःच गाडी चालवत सगळीकडे जात आहेत. चहावाल्याच्या प्रकरणामुळे आता मातोश्रीवर सर्व कर्मचाऱ्यांची तपासणी होणार आहे.

ही लढाई संपवायची आहे; लपून बसू नका, स्वत:हून पुढे या : अजित पवार 
ज्या नागरिकांमध्ये कोरोनाची लक्षणे आहेत किंवा ज्यांना संशय आहे त्यांनी लपून न राहता आरोग्य यंत्रणांशी तत्काळ संपर्क साधावा. हा लढा लवकर संपला पाहिजे. त्यासाठी संशयितांनी पुढे यावे, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे. राज्यातील डॉक्टर, नर्सेस, पोलिस, सफाई कर्मचाऱ्यांत संसर्ग दिसू लागला आहे. हा प्रसार थांबवायचा असेल तर कोरोनाची साखळी तोडणे आणि त्यासाठी सर्वांनी घरात थांबणे महत्त्वाचे असल्याचे पवार म्हणाले. 

लॉकडाऊन संपूर्णत: शिथिल होणार नाही : टोपे
१० ते १५ एप्रिलदरम्यान परिस्थितीचा अभ्यास केल्यानंतर लॉकडाऊनबाबत  मुख्यमंत्री चर्चा करतील. केंद्राच्या सूचनांनुसार ठरवावे लागेल. मात्र संपूर्णतः लॉकडाऊन शिथिल होईल असे नाही, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. केंद्राकडे ३.२५ लाख पीपीई किट्स, ९ लाख एन- ९५ मास्क व ९९ लाख ट्रिपल लेअर मास्कची मागणी केली आहे. राज्यात सध्या ३५ हजार पीपीई किट्स, ३ लाखांच्या आसपास एन-९५ मास्क, २० लाख ट्रिपल लेअर मास्क, १३०० व्हेंटिलेटर्स उपलब्ध आहेत.

बातम्या आणखी आहेत...