आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबृहन्मुंबई पालिका प्रशासनाने राबवलेल्या ‘सेरो सर्व्हे’ ६ च्या दुसऱ्या टप्प्यातील निष्कर्ष हाती आले आहेत. त्यानुसार ‘कोविड’ प्रतिबंधात्मक लशीच्या पहिल्या व दुसऱ्या मात्रेनंतर वर्धक-मात्रा (बूस्टर डोस) घेणाऱ्यांमध्ये प्रतिपिंडांची (अँटिबाॅडीज) संख्या लक्षणीय आढळून आली आहे. त्यांचा ‘सेरो पॉझिटिव्हिटी’ दर ९९.९० टक्के आहे, अशी माहिती बृहन्मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.
मार्च - एप्रिल २०२२ मध्ये सेरो सर्वेक्षणाचा पहिला टप्पा करण्यात आला होता. सेरोसर्व्हेचा दुसरा टप्पा ६ महिन्यांनंतर करण्यात आला. यात पहिल्या टप्प्यामध्ये सहभागी झालेल्या सर्व व्यक्तिंची प्रतिपिंड पातळी पुन्हा मोजण्यात आली. या सर्वेक्षणात २,७३३ व्यक्ती सहभागी होत्या. या सर्वेक्षणात फक्त एक व्यक्ती सोडून सर्व जण सेरो पॉझिटिव्ह आढळले. याचाच अर्थ सेरो पॉसिटीव्हिटी दर ९९.९ टक्के आढळला. चाचणी किटच्या तपशिलानुसार ५० AU/mL आणि त्याहून अधिक प्रतिपिंड संख्या असलेल्या व्यक्तीस ‘सेरो पॉझिटिव्ह’ मानले जाते. या सर्वेक्षणात ४५ वर्षांहून अधिक वयोगटातील व्यक्तींची सरासरी प्रतिपिंड संख्या इतर वयोगटातील व्यक्ती पेक्षा अधिक होती. ज्यांनी कोविड-१९ लशीची वर्धक-मात्रा (प्रिकॉशन डोस) घेतला होता, अशा व्यक्तींमध्ये दोन मात्रा घेतलेल्या लोकांपेक्षा अधिक प्रतिपिंडे आढळून आली. ज्यांनी लशीचे दोन डोस घेतले किंवा ज्यांनी वर्धक-मात्रा अर्थात प्रिकॉशन डोस घेतला आहे आणि ज्यांची कोविड-१९ चाचणी एकदातरी सकारात्मक आलेली आहे, त्यांच्यात कोविड-१९ ची चाचणी नकारात्मक आलेल्या व्यक्तिंपेक्षा प्रतिपिंड संख्या अधिक आढळून आली आहेत. पहिल्या टप्प्याच्या तुलनेत सर्व सहभागी झालेल्यांपैकी ५७ टक्के व्यक्तींच्या प्रतिपिंड संख्येमध्ये घट दिसून आली. मात्र, असे असले तरी ६ महिन्यांनंतर त्यांच्या शरीरात प्रतिपिंड यांची पातळी लक्षणीय होती. एकूण, वर्धक-मात्रेची (प्रिकॉशन डोस) उपयुक्तता सिद्ध झाल्याचा दावा पालिकेच्या आरोग्य विभागाने केला आहे. त्यामुळे आता कोरोना बूस्टर घ्यावा, असे सांगण्यात येत आहे.
सर्वेक्षणात २५ ते ४५ वयोगटातील लाेक सहभागी या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या २,७३३ व्यक्तिंपैकी ५९ टक्के व्यक्ती हे २५ ते ४५ वर्ष वयोगटातील होते, तर ४१ टक्के व्यक्ती हे ४५ ते ६५ वर्ष वयोगटातील होते. तसेच यात ५७ टक्के पुरुष आणि ४३ टक्के महिलांचा समावेश होता. केवळ १.३ टक्के व्यक्तीच अशा होत्या, ज्यांनी कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीचा एकच डोस घेतला होता. तर ५५ टक्के व्यक्तींनी दोन डोस घेतले होते आणि ४३ टक्के व्यक्तींनी लसीची वर्धक-मात्रा अर्थात प्रिकॉशन डोससुद्धा घेतला होता. केवळ ०.७ टक्के सहभागी व्यक्तींनी कोविड-१९ लसीचा कोणताही डोस घेतला नव्हता.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.