आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मंत्रालयातील धक्कादायक प्रकार:​​​​​​​मुख्यमंत्र्यांनी सही केल्यानंतर फाईलमधील मजकुरात केला बदल, चौकशीचा आदेशच रद्द करण्याचा प्रयत्न; अशोक चव्हाणांच्या सतर्कतेने प्रकार उघड

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अधीक्षक अभियंत्याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सही केलेल्या एका महत्त्वाच्या फाईलमध्ये परस्पर बदल केल्याचा धक्कादायक प्रकार मंत्रालयात समोर आला आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेला चौकशीचा आदेश परस्पर रद्द करण्यासाठी केलेल्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्र्यांनी एका अभियंत्याच्या चौकशीचे आदेश दिले होते. मात्र फाईलमधील मजकूरामध्ये मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर बदल करण्यात आला. याप्रकरणी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने या संदर्भात वृत्त दिले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या एका अधीक्षक अभियंत्याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी संबंधित फाईलवर सहीदेखील केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर या फाईलमधील मजकूरामध्ये परस्पर बदल करण्यात आला. मुख्यमंत्र्यांची सही झाल्यानंतर स्वाक्षरीच्या वरील भागामध्ये लाल शाईने एक दुसरा मजकूर लिहण्यात आला. त्यामध्ये संबंधित अभियंत्याची चौकशी बंद करावी असेही लिहिण्यात आले होते. प्रत्येक महत्त्वाच्या निर्णयामध्ये मुख्यमंत्र्यांची परवानगी अंतिम असते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांची स्वाक्षरी ही महत्त्वाची असते. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या सहीनंतर थेट मजकुरच बदलण्याचे धाडस कुणी केले असा प्रश्न उपस्थित होत आहे.

फाईलमध्ये कोणत्या अभियंत्याचे नाव?
शिवसेना-भाजप युतीचे सरकार असताना जे.जे. स्कूल ऑफ आर्टसमधील बांधकामात अनियमितता झाल्याच्या कारणावरून सार्वजनिक बांधकाम खात्यातील अनेक अभियंत्यांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. यामध्ये अधीक्षक अभियंता नाना पवार यांचाही समावेश होता. नाना पवार हे त्यावेळी कार्यकारी अभियंता होते. आता त्यांच्या फाईलमध्ये हा फेरफार करण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे.

अशोक चव्हाणांच्या सतर्कतेने प्रकार उघड
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. यानंतर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांनी चौकशीची फाईल मुख्यमंत्र्यांकडे पाठवली. मुख्यमंत्र्यांनी फाईलवर सही केल्यानंतर या फाईल पुन्हा सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांकडे आल्या. मात्र सर्व अभियंत्यांच्या चौकशीला हिरवा कंदील दिला असताना फक्त नाना पवार यांचीच चौकशी रद्द करण्याचा आदेश मुख्यमंत्र्यांनी का दिला असा प्रश्न चव्हाणांना पडला. तसेच मुख्यमंत्र्यांची सही असलेल्या छोट्या जागेमध्ये चौकशीचे आदेश रद्द करण्याचा शेरा बसवण्यात आला होता. इतर वेळी मुख्यमंत्री मजकुर आणि सहीमध्ये पुरेशी जागा सोडतात. यावेळी असे का केले नाही यावरुन चव्हाणांना संशय आला. त्यांनी फाईल पुन्हा मुख्यमंत्री कार्यालयात पाठवली. मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी सही केलेल्या फाईल स्कॅन करुन ठेवल्या जातात. हे तपासल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या सहीच्या वरच्या भागात असा कोणताही शेरा मुख्यमंत्र्यांनी लिहला नाही हे उघड झाले. मुख्यमंत्र्यांनी नाना पवार यांच्या चौकशीसाठी मंजुरी दिली होती. त्यामुळे संबंधित फाईलमध्ये कोणीतरी परस्पर फेरफार केल्याचे स्पष्ट झाले.

बातम्या आणखी आहेत...