आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आले. या लॉकडाउनमध्ये परराज्यात अडकलेल्या मजुरांचे हाल झाले. यादरम्यान, प्रवासी मजुरांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी बॉलवूड अभिनेता सोनू सूद पुढे आला आणि त्याने ट्रेन, बस आणि विमानामार्फत अनेकांना त्यांच्या घरी पोहचवले. पण, आता सोनूच्या कामावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवसेनेचे मुखपत्र सामनातून निशाना साधला आहे.
संजय राऊत यांनी सामनात सोनू सूदच्या कामावर प्रश्न उपस्थित केले आहेत. संजय राऊत यांनी रोखटोक कॉलममध्ये लिहीले की, लॉकडाउनदरम्यान अचानक सोनू सूद नावाचा एक महात्मा तयार झाला. इतक्या लवकर एखाद्याला महात्मा बनवले जाऊ शकते? राउत यांनी यावेळी प्रवासी मजुरांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी लागणाऱ्या पैशांवरही प्रश्न उपस्थित करत, सोनू सूदला भाजपचा मुखवटा म्हटले आहे.
यावेळी राऊत म्हणाले की, 'सोनू सूद यांनी गेल्या काही दिवसांत हजारो मजुरांना त्यांच्या राज्यात परत पाठवले. रेल्वे, बसेस, विमानाची तिकिटे त्यांनी काढली. प्रवासाची व्यवस्था केली. एक चॅरिटी ट्रस्टच्या माध्यमांतून हे सर्व केले. ट्रस्टच्या माध्यमातून जमलेल्या पैशांतून मजुरांचा हा प्रवास खर्च उचलला असे सांगितले गेले. केरळच्या एर्नाकुलम येथे ओडिशाच्या 177 मुली अडकून पडल्या. त्यांना सूद महाशयांनी एका खास विमानाने भुवनेश्वरला पोहोचवले. विमानाची व्यवस्था होत नव्हती, तेव्हा बंगळुरूवरून एक खास विमान कोच्चीला आणले व तेथून या सर्व मुलींची रवानगी ओडिशाला केली. त्याबद्दल ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी सोनू सूद आणि कंपनीचे आभार मानले आहेत. एखादी राजकीय, शासकीय, प्रशासकीय यंत्रणा पाठीशी असल्याशिवाय सोनू सूद हे सर्व करू शकेल काय?' असा सवाल राऊत यांनी उपस्थितीत केला.
'सोनू सूदचा चेहरा पुढे करून महाराष्ट्रातले काही राजकीय घटक ‘ठाकरे सरकार’ला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न करीत होते. सोनू सूद हा ‘महाबली’, ‘बाहुबली’ किंवा ‘सुपरहीरो’ आहे असे चित्र रंगवण्यात हे राजकीय पक्ष काही प्रमाणात यशस्वी झाले. भारतीय जनता पक्षातील काही लोकांनी सोनूला दत्तक घेतले (हे दत्तक विधान गुप्त पद्धतीने झाले.) व त्याला पुढे ठेवून उत्तर भारतीय मजुरांत घुसण्याचा प्रयत्न झाला. सोनू सूद हा एक अभिनेता आहे. पैसे घेऊन हवे ते संवाद फेकायचे व अभिनय करायचा हा त्याचा पेशा आहे. काही वर्षांपूर्वी ‘कोब्रा पोस्ट’च्या एका स्टिंग ऑपरेशनने सोनू सूदच्या अशाच व्यवहाराचा भांडाफोड केला आहे. सोशल माध्यमांवर इन्स्ट्राग्राम, ट्विटर अकाऊंटवरून छुप्या पद्धतीने भाजपच्या कार्याचा उदोउदो करण्याचे त्याने मान्य केले होते व त्यासाठी महिन्याला ‘दीड कोटी’ इतकी बिदागी त्याने मागितली होती. भारतीय जनता पक्षाचा नेता बनून सूदला भेटलेला ‘कोब्रा’चा प्रतिनिधी व सूदमधील व्यवहार्य संवाद धक्कादायक आहे. पैसे मिळाले तर कुणाचाही मुखवटा लावून वावरायचे व प्रचार करायचा हे सूदसारख्या अनेकांचे धंदे आहेत' असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
#Corona के संकट काल में इंसानियत के नाते #मजदूरों को सड़क पर उतर के सहायता करने वाले @SonuSood पर @rautsanjay61 का बयान दुर्भाग्यपूर्ण खुद की सरकार #Corona से निपटने में नाकाम हो गई ?यह सच्चाई सोनू सूद पर आरोप करके छुप नहीं सकती जिस कामकी सराहना करने की आवश्यकता है उस पर भी आरोप?
— Ram Kadam (@ramkadam) June 7, 2020
संजय राऊत यांचे वक्तव्य दुर्दैवी- राम कदम
भाजप नेते राम कदम यांनी संजय राउत यांच्या वक्तव्याला दुर्दैवी म्हटले आहे. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये लिहीले की- "कोरोनाच्या संकट काळात मानुसकी म्हणून रस्त्यावर उतरुन मजुरांना मदत करणाऱ्या सोनू सूदवरील संजय राऊत यांचे वक्तव्य दुर्दैवी आहे. स्वतःचे सरकार कोरोनाचा सामना करण्यात अपयशी ठरले आहे. सोनूवर आरोप करुन, हे सत्य लपून राहू शकत नाही. ज्या कामाचे कौतुक व्हायला हवे, त्यावर आरोप केले जात आहेत."
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.