आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला:मुंबईमध्ये कोरोनाचा नवीन एक्सई व्हेरिएंट आढळला, केंद्र सरकारकडून अद्याप दुजोरा मिळाला नाही

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

देशात कोरोना विषाणूचा एक्सई हा नवा व्हेरिएंट आढळला आहे. मुंबईत बुधवारी एक्सईचा पहिला रुग्ण आढळला. मुंबईत कोरोनाच्या ३७६ नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यात हा नवा व्हेरिएंट आढळला आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेने त्याला दुजोरा दिला आहे. नव्या व्हेरिएंटचा संसर्ग झालेल्या रुग्णात कुठलेही गंभीर लक्षण आढळले नाही. तथापि, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने अद्याप देशात एक्सई व्हेरिएंट आढळल्याच्या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. भारताचे कोविड-१९ जिनोमिक्स कन्सॉर्टियम (इन्सकॉग) या प्रकरणाचे सखोल जिनोमिक विश्लेषण करत आहे.

एक्सई व्हेरिएंटचा पहिला रुग्ण या वर्षी १९ जानेवारीला ब्रिटनमध्ये आढळला होता. त्यानंतर थायलंड आणि न्यूझीलंडमध्येही त्याचे रुग्ण आढळले. जागतिक आरोग्य संघटनेनुसार, एक्सई व्हेरिएंट हा ओमायक्रॉनच्या बीए.१ आणि बीए.२ हे दोन स्ट्रेन्स मिळून तयार झाला आहे. त्याचा ओमायक्रॉनच्या तुलनेत १०% जास्त संसर्ग होऊ शकतो.

पुण्यात एकही कोरोना रुग्ण रुग्णालयात दाखल नाही
पुणे| नायडू रुग्णालयातील एकमेव कोरोना रुग्ण बरा होऊन घरी परतल्याने शहरातील शासकीय आणि खासगी रुग्णालयात आता एकही कोरोना रुग्ण नाही. जे ९८ रुग्ण सक्रिय आहेत ते सर्व गृह विलगीकरणातील आहेत, अशी माहिती महापालिकेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. संजीव वावरे यांनी दिली. नायडू रुग्णालयातील शेवटच्या रुग्णाला बुधवारी डिस्चार्ज मिळाला.

ओमायक्राॅन एक्सईची लक्षणे
काही रुग्णांत त्याची सौम्य लक्षणे दिसू शकतात, तर काही रुग्णांत गंभीरही लक्षणे असू शकतात. ज्यांनी लस घेतली आहे अशा रुग्णांत त्याची सौम्य लक्षणे दिसू शकतात, तर ज्यांनी लस घेतली नाही अशा रुग्णांत गंभीर लक्षणे दिसू शकतात. एक्सई व्हेरिएंटच्या लक्षणांत ताप, घशात खवखव होणे, खोकला आणि सर्दी, त्वचेत जळजळ, गॅस्ट्रोइंटेस्टाइनल डिस्ट्रेस यांचा समावेश आहे.

बातम्या आणखी आहेत...