आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६ व्या महापरिनिर्वाणदिनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पचक्र अर्पण करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. या वेळी राज्यभरातून आलेल्या अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन केले. दादर येथील चैत्यभूमीवर महापालिका आणि राज्य सरकारकडून विशेष सोय करण्यात आली. दरम्यान, राज्यभरातून ५ लाख अनुयायांनी चैत्यभूमीवर बाबासाहेबांना अभिवादन केल्याचे सांगण्यात आले. मुंबईत येणाऱ्या अनुयायांसाठी महानगरपालिकेतर्फे चैत्यभूमी परिसर, छत्रपती शिवाजी महाराज मैदान परिसर, दादर रेल्वेस्थानक, राजगृह (हिंदू कॉलनी), डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय (वडाळा) व लोकमान्य टिळक टर्मिनस (कुर्ला) येथे आवश्यक त्या सर्व नागरी सेवा-सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या.
इंदू मिलचे स्मारक लवकरच इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक लवकरात लवकर पूर्ण होईल, यासाठी राज्य सरकार पूर्ण प्रयत्न करत आहे. जगाला हेवा वाटेल असे स्मारक बनवणार आहोत. हे स्मारक लवकरच पूर्ण होईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
संविधानामुळे देश प्रगतिपथावर देशाची दशा आणि दिशा बदलण्याचे काम बाबासाहेबांनी केले. व्यक्तीसोबत जात, धर्म, भाषा अशा कोणत्याही आधारे भेदभाव करता येणार नाही, हा बीजमंत्र देणारे संविधान बाबासाहेबांनी दिले. संविधानामुळेच देशाने प्रगती केल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
सोमवारपासून अनुयायी दाखल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी सोमवारी सकाळपासूनच अनुयायी मोठ्या संख्येने चैत्यभूमीवर दाखल झाले होते. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांचे सुमारे तीन हजार कर्मचारी तैनात करण्यात आले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.