आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपालांचा दौरा:राज्यपालांचे एक पाऊल मागे; आढावा बैठका रद्द, फक्त चर्चा; आजपासून 3 दिवस मराठवाड्याचा सुधारित दौरा जाहीर

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • राज्यपालांवर दुसऱ्यांदा नामुष्की

नियोजित मराठवाडा दौऱ्यात जिल्हाधिकारी कार्यालयातील आढावा बैठकांवरून वादंग निर्माण झाल्यानंतर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एक पाऊल मागे घेतले आहे. ५ ऑगस्टपासून ते नांदेड, परभणी आणि हिंगोलीच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्याचा सुधारित कार्यक्रम राजभवनाने बुधवारी जारी केला असून तिन्ही आढावा बैठका रद्द करत केवळ शासकीय विश्रामगृहावर अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली जाणार आहे. यामुळे आघाडी सरकार आणि राजभवन यांच्यातील संघर्षावर तात्पुरता पडदा पडला आहे.

राज्यपालांनी नांदेड, हिंगोली आणि परभणी या तीन जिल्ह्यांच्या दौऱ्यात जिल्हा प्रशासनाशी आढावा बैठका ठेवल्या होत्या. त्यावर मंगळवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मोठा आक्षेप घेण्यात आला होता. तसेच राज्यपालांनी आढावा बैठका घेऊ नयेत, तो सरकारचा अधिकार आहे, तुम्ही मुख्यमंत्री नाहीत, राज्यात दोन सत्ताकेंद्रे करू नका असे अवगत करण्यात यावे, असे मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिवांना आदेश दिले होते.

सुधारित दौऱ्यात नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयातील दुपारी ३ वाजेची, हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयातील ४ वाजेची आणि परभणी जिल्हाधिकारी कार्यालयात होणारी ६ वाजेची आढावा बैठक काढून टाकण्यात आली. मात्र या दौऱ्यात राज्यपालांनी जिल्हा प्रशासनाशी चर्चा करण्यासाठी खास वेळ राखीव ठेवली आहे. तसेच प्रशासनाबरोबरची सदर चर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाऐवजी शासकीय विश्रामगृहात होईल, असे सुधारित दौऱ्यात दाखवले.

मलिक यांचे आवाहन धुडकावले
राज्याच्या अल्पसंख्याक विभागाने नांदेड येथील स्वा. रा. तीर्थ विद्यापीठात दोन वसतिगृहे बांधली आहेत. सध्या वसतिगृहे विद्यापीठाकडे सोपवलेली नाहीत. त्यामुळे त्याचे उद्घाटन राज्यपालांनी करू नये, असे आवाहन अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी केले होते. मात्र राज्यपालांनी हे आवाहन धुडकावले. सुधारित दौऱ्यातही वसतिगृहाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम कायम ठेवण्यात आला आहे.

राज्यपालांवर दुसऱ्यांदा नामुष्की
सरकार स्थापनेपासून भगतसिंह कोश्यारी आणि सरकार यांच्यात संघर्ष सुरू आहे. या संघर्षात मुख्यमंत्र्यांनी खासगी दौऱ्यासाठी राज्यपालांना सरकारी विमान नाकारले होते. मराठवाडा दौऱ्यात जिल्हा प्रशासनाबरोबर ठेवलेली आढावा बैठक रद्द करण्याची दुसरी नामुष्की राज्यपालांवर आता ओढवली आहे.

बातम्या आणखी आहेत...