आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अडचणीत वाढ:दोन वर्षांपूर्वीचे आत्महत्या प्रकरण; पत्रकार अर्णब गोस्वामी गोत्यात

मुंबई3 वर्षांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • गृह राज्यमंत्री सतेज पाटलांचे चौकशीचे सूतोवाच

पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्यावर दोन वर्षांपूर्वी आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दलच्या दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास करण्याचे राज्याचे गृह राज्यमंत्री सतेज पाटील यांनी बुधवारी सूतोवाच केले. याप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर काँग्रेसने निशाणा साधला आहे. अन्वय मधुकर नाईक या मुंबईतील इंटेरिअर डिझायनरने दोन वर्षांपूर्वी आत्महत्या केली होती. सुसाइड नोटमध्ये नाईक यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह फिरोज शेख आणि नितेश सारडा यांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे म्हटले आहे. घटनेस दोन वर्षे झाल्याने अन्वय यांच्या पत्नी अक्षता यांनी बुधवारी ट्विटरवर व्हिडिओ टाकला आहे. त्यांनी पतीच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली. प्रदेश काँग्रेसने तो व्हिडिओ टि्वट केला. त्यानंतर गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी पोलिस महासंचालकांना टॅग करत या प्रकरणाचा तपास करण्याचे निर्देश दिले.

काँग्रेस कार्यकर्त्यांनी अर्णब प्रकरणाच्या निमित्ताने तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर चौकशी दाबल्याचा आरोप केला आहे. अलिबाग पोलिसात याप्रकरणी गुन्हा नोंद झाला होता. पण, तपास झाला नाही. त्या वेळी गृहविभाग फडणवीस यांच्याकडे होता. त्यामुळे विरोधी पक्षनेते असलेले देवेंद्र फडणवीस यांच्याकडे काँग्रेस अंगुलिनिर्देश करत आहे. हा वाद पेटण्याची शक्यता आहे.

पैसे दिले नाहीत म्हणून आत्महत्या : पत्नीचा आरोप

अन्वय नाईक यांना वेळेत पैसे दिले नाहीत, त्यामुळे त्यांनी आत्महत्या केली, असा आरोप त्यांच्या पत्नी अक्षता यांचा आहे. विशेष म्हणजे अन्वय यांच्या मृतदेहाशेजारी त्यांच्या आई कुमुद यांचा मृतदेह आढळला होता. अलिबाग पोलिसांत याप्रकरणी गुन्हा नोंद आहे. अर्णब यांच्यावर मागच्या आठवड्यात देशभरात किमान डझनभर गुन्हे नोंद झाले आहेत. अर्णब यांनी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याविरोधात एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यामुळे काँग्रेस आणि अर्णब गोस्वामी यांच्यात संघर्ष पेटला आहे.

बातम्या आणखी आहेत...