आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवसेनेतल्या बंडखोरीसाठी आम्ही पिता-पुत्र जबाबदार:आदित्य ठाकरेंची कबुली; शिंदेवर हल्लाबोल, तर फडणवीस-मोदींबाबत मवाळ

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शिवसेनेतील बंडखोरीसाठी मी आणि उद्धव ठाकरे जबाबदार आहोत. आम्ही आमच्या लोकांवर विश्वास ठेवला आणि त्यांनी आमचा विश्वासघात केला, असे परखड आत्मपरीक्षण आज आदित्य ठाकरे यांनी केले.

इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह कार्यक्रमात आदित्य यांनी अनेक मुद्द्यांवर आपली मते मांडली. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांवर सडकून टीका केली. मात्र, याचवेळी त्यांनी भाजप, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर नरमाईची भूमिका घेतली.

हे सर्व राक्षसी महत्त्वकांक्षेमुळे

आदित्य यांनी या कार्यक्रमात शिंदे गटाच्या आमदारांना पुन्हा एकदा गद्दार म्हणून हिणवले. बंडखोरांना मी गद्दारच म्हणेन, कारण माझ्याकडे दुसरे शब्द नाहीत. त्यांनी केलेले काम कायदेशीर म्हटल्यास प्रत्येक राज्यात राजकीय अशांतता निर्माण होईल. यावेळी आदित्य ठाकरेंनी 'शिंदे गटातील आमदारांची अली बाबा आणि 40 चोरांशी तुलना' केली. पुढे आदित्य म्हणाले की, शिवसेनेतील बंडखोरीसाठी मी आणि उद्धव ठाकरे जबाबदार आहोत. आम्ही आमच्या लोकांवर विश्वास ठेवला आणि त्यांनी आमचा विश्वासघात केला. एका माणसाच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळे हे सर्व झाले, असे आदित्य यांनी म्हटले.

41 जागांवर निवडणूक व्हावी

शिंदे गटाच्या आमदारांमध्ये हिंमत असेल तर त्यांनी राजीनामा देऊन निवडणुकीला सामोरे जावे. राज्यातील जनता ही उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या बाजूने आहे. गद्दारांनी जनादेशाचा अनादर केला. मी रोज किंवा जवळपास एक दिवसाआड हे आव्हान देत असतो. मात्र, ते स्वीकारत नाहीत. मला पूर्ण राज्यात मध्यावधी निवडणूक व्हावी असे वाटत नाही. केवळ 41 जागांवर निवडणूक व्हावी, या मताचा मी असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

देवेंद्र फडणवीस अत्यंत हुशार

या कार्यक्रमात आदित्य ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबतही मोठे वक्तव्य केले. आदित्य ठाकरे म्हणाले की, देवेंद्र फडणवीस हे अत्यंत अनुभवी नेते आहेत. मी त्यांच्यासोबत काम केले आहे. त्यांनी शिंदे गटासोबत मिळून सरकार स्थापन केले, हे बघूनच मी कोड्यात पडलो. ते अजूनही या सरकारसोबत कसे राहू शकतात, याचेही मला आश्चर्य वाटते. कारण शिंदे-फडणवीस सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांची ज्याप्रकारे बदनामी होत आहे, त्यांना ट्रोल केले जात आहे, ते पाहून मला खूपच वाईट वाटते. मी जर आजच्या घडीला उपमुख्यमंत्री असतो तर असल्या सरकारमध्ये राहिलो नसतो. देवेंद्र फडणवीस यांच्या जागी असतो तर मी राजीनामा दिला असता आणि नव्याने निवडणूक घेतली असती.

भाजप आणि शिवसेनेमध्ये एक करार झाला होता, हे सर्वांना माहीत आहे. निवडणुकांपूर्वी सरकार स्थापन झाले असते तर आमचा मुख्यमंत्री अडीच वर्षे आणि त्यांचा मुख्यमंत्री अडीच वर्षे असे ठरले होते. तसे झाले असते तर आता अडीच वर्षे पूर्ण झाली असती आणि देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले असते. पण कदाचित त्यांच्या मनात काहीतरी वेगळेच असेल, असेही ठाकरे म्हणाले.

पंतप्रधानांशी चांगले संबंध

कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत चांगले संबंध असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, महाराष्ट्रात सरकार असताना केंद्र सरकारशी चांगल्या समन्वयाने कामे झाली. आता महाराष्ट्राच्या हातातून किती प्रकल्प निघून गेले हे तुम्ही पाहिले. तसेच राज्यात असंवैधानिक सरकार आल्यापासून कोणीही गुंतवणूक करू इच्छित नाही. केंद्राशी योग्य समन्वय साधता येत नाही, हे या लोकांचे अपयश आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतानाही केंद्र सरकारशी चांगल्याप्रकारे समन्वय होता. त्यावेळी राज्यात 6 लाख कोटींची गुंतवणूक आल्याचा दावा आदित्य ठाकरे यांनी केला.

पंतप्रधानांबद्दल अपशब्द काढले नाही

2021 मध्ये पंतप्रधान मोदींची दिल्लीत उद्धव ठाकरे यांनी भेट घेतली होती. या भेटीनंतर ते भाजपसोबत जाऊ शकतात, असे त्यांच्याकडून पुन्हा सूचित करण्यात आले होते. याविषयी आदित्य ठाकरे यांना विचारणा करण्यात आली. आदित्य ठाकरे म्हणाले की, पंतप्रधानांशी वैर नाही. प्रत्येक भेटीकडे राजकीय दृष्टीकोनातून पाहू नये. तेव्हा उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान मोदींशी एका राज्याचे मुख्यमंत्री म्हणून चर्चा केली होती. राज्यातील लोकांच्या समस्या होत्या, त्यांच्या काही अपेक्षा होत्या, त्या पूर्ण करण्यासाठी पंतप्रधानांची त्यांनी भेट घेतली होती. आम्ही कधीही पंतप्रधानांबद्दल अपशब्द काढले नाहीत. आम्ही त्यांचा आदर करतो, असेही आदित्य म्हणाले.

आदित्य हिंदुत्वावर मवाळ?

तुम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावर मवाळ असता, असाही एक समज निर्माण झाला आहे. बाळासाहेब ठाकरे यांची जी प्रतिमा होती, ती तुमची नाही, असा एक प्रश्न आदित्य यांना विचारण्यात आला. यावर आदित्य म्हणाले की, प्रत्येक वेळेचे स्वतःचे राजकारण असते. 60 आणि 70 च्या दशकात महाराष्ट्रातील तरुणांना रोजगार मिळत नव्हता. त्यांचे हक्क मारले जात होते. म्हणूनच मग बाळासाहेबांनी मातृभूमीचा मुद्दा उपस्थित केला. पण ज्या काळात मी राजकारण करतोय तो काळ वेगळा आहे. आता लोकांचे प्रश्न बदलले आहेत. ज्या समस्यांचा आजच्या पिढीशी संबंध आहे त्याच मी मांडणार. आपल्या संविधानाच्या आदर्शांचे काय होते, लोकशाहीचे, कायद्याचे राज्य आणि न्यायाचे काय होते हे आज माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. याशिवाय, राज्यात कुठेही राजकीय बॅनर, होर्डिंग्ज लावू नयेत. मी त्याचे समर्थन करत नाहीत. याप्रश्नी सर्व पक्षांना पत्र लिहिणार असल्याचे आदित्य यांनी म्हटले.

बातम्या आणखी आहेत...