आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडणवीस म्हणाले, नया है वह...:अब्दुल सत्तार यांची हळद अजून उतरायची आहे, शिवसेनेने टोचले कान

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

भाजप नेते नितीन गडकरी यांनी मध्यस्थी केली तर शिवसेना-भाजप यांची पुन्हा युती होऊ शकते, अशी मुक्ताफळे उधळणारे शिवसेनेचे मंत्री अब्दुल सत्तार यांचा शिवसेना व भाजपच्या नेत्यांनी बुधवारी (५ जानेवारी) समाचार घेतला. “सत्तारांची अजून हळद उतरायचीय’ या शब्दांत सेना खासदार संजय राऊत यांनी फटकारले, तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी “नया है वह’ असे म्हणत सत्तारांचे कान टोचले.

अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड-सोयगाव मतदारसंघासह औरंगाबाद जिल्ह्यातील रस्ते विकासासंदर्भात दिल्ली येथे नितीन गडकरी यांची मंगळवारी भेट घेतली होती. या भेटीनंतर त्यांनी युतीसंदर्भात दावा केला होता. शिवसेना खासदार तथा प्रवक्ते संजय राऊत यांना पणजी येथे प्रसिद्धिमाध्यमांनी सत्तार यांच्या वक्तव्यावर बोलते केले तेव्हा ते म्हणाले की, ‘हे जे अब्दुल सत्तार मंत्री आहेत, त्यांनी पक्षात २५ वर्षे पूर्ण केली तर त्यांच्या विधानाला काही अर्थ राहील.

अजून त्यांच्या अंगावरची हळद उतरायची आहे. अजून त्यांना शिवसेनेची हळद पूर्णपणे लागायची आहे. बोलू द्या त्यांना.... पक्ष समजून घ्यायला वेळ लागतो. जे सेनेत जन्माला आले नाहीत त्यांना किमान २० वर्षे पुढची शिवसेनेत घालवावी लागतील. मग त्यांनी सेनेतील घडामोडींविषयी बोलले पाहिजे. सत्तार काँग्रेसमधून शिवसेनेत आले आहेत. हळूहळू रुळत आहेत. लोकप्रिय होत आहेत. पण अशा प्रकारे विधान करून अकारण विरोधी पक्षाच्या हातात कोलीत मिळेल असे कोणी करू नये, असा सल्ला संजय राऊत यांनी सत्तार यांना दिला.

दोन भावांत भांडणे झाल्यावर पुन्हा एकत्र यावे लागते : चंद्रकांतदादा : भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि मंत्री अब्दुल सत्तार या एकमेकांचे विरोधकांची दिल्लीत भेट झाली. याबाबत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले, युतीबाबत काहीजण खासगीत बोलतात तर काहीजण जाहीरपणे बोलतात.

राजकारणात एका क्षणात शक्यता बदलते. खऱ्या शिवसैनिकाला दाबून ठेवता येत नाही हे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी लक्षात घेऊन त्यांना पुन्हा एकदा हिंदुत्वाकडे जावे लागेल. युतीबाबत काही सांगू शकत नाही राजकारणात एका क्षणात शक्यता निर्माण होते. अनेक वर्ष एकत्रित राहिलेल्या दोन भावंडामध्ये भांडणे झाल्यानंतर त्यांना समंजसपणे पुन्हा एकत्र यावे लागते, असे ते म्हणाले.

सत्तार यांची मुक्ताफळे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ठरवल्यास ते कुठेही पूल बांधू शकतात. भाजप-शिवसेना यांच्यातही तेच पूल बांधू शकतात. तसेच रश्मी ठाकरे मुख्यमंत्रिपद उत्तम प्रकारे सांभाळू शकतील, असे वक्तव्य सत्तार यांनी केले होते.

बोलणारा माणूस महत्त्वाचा हवा : देवेंद्र फडणवीस
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली. फडणवीस म्हणाले, नया है वह! त्यांना काय माहीत शिवसेना काय आहे! उद्धव ठाकरे आजारी आहेत. त्याच्या आधी पाच-सहा महिन्यांत तरी सत्तार यांची उद्धवजींशी भेट झाली आहे का? हे माहीत नाही. त्यामुळे असे काही बोलायचे असेल तर महत्त्वाचा माणूस हवा, असे म्हणत फडणवीस यांनी सत्तारांच्या वक्तव्याची हवा काढली.

बातम्या आणखी आहेत...