आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे सतत त्यांच्या विधानाने चर्चेत असतात. त्यांनी शेतकऱ्यांच्या आत्महत्येबाबत एक बेजबाबदार वक्तव्य केले आहे. त्यांनी केलेल्या विधानावरुन आज विधीमंडळात गदारोळ होण्याची शक्यता आहे.
अवकाळी आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सोयगावमधील नुकसानीची पाहाणी केली. यावेळी बोलताना त्यांनी हे विधान केले आहे.
कृषीमंत्री सत्तार म्हणाले की, शेतकरी आत्महत्या हा काही आजचा विषय नाही. अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात. शेतकऱ्यांना मदतीसाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी नमूद केले. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या जिल्ह्यात आठवड्याभरात 7 शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. यातील 4 शेतकरी हे सत्तार यांच्या मतदारसंघातील आहेत. सत्तारांच्या या वक्तव्यामुळे लोकांमध्ये संतापाची लाट आहे. माझ्या मतदारसंघात फिरुन आलो. शेतीचे फारकाही नुकसान झालेले नाही. काही प्रमाणात नुकसान झाले आहे, त्यामुळे वस्तूनिष्ठ पंचनाम्यासाठी सोयगावला जावून आलो. मोठे नुकसान नसले तरी पंचनामे करण्याचे निर्देश दिले असल्याचेही त्यांनी म्हटले होते.
जयंत पाटलांचा सत्तारांवर निशाणा
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा माजी मंत्री जयंत पाटील म्हणाले की, अब्दुल सत्तार आणि राज्य सरकार हे असंवेदनशील आहे.कृषीमंत्र्यांनी वेळोवेळी असंवेदनशीलपणा दाखवला असून शेतकऱ्यांच्या बाबतची कृषीमंत्र्यांची भाषा ही दिलासादायक नाही, असा टोला शेतकऱ्यांच्या आत्महत्या प्रकरणी सत्तारांनी केलेल्या वक्तव्यावर जयंत पाटील यांनी सांगलीच्या कासेगावात बोलताना लगावला आहे.
विरोधक आक्रमक होण्याची शक्यता!
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यापूर्वीही त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे अनेकदा अडचणीत आले आहे. काही वेळा त्यांनी माफीही मागावी लागली होती. त्यात आता शेतकरी आत्महत्याच्या मुद्द्यावरून सत्तार यांनी केलेल्या विधानामुळे त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. सध्या सुरु असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात याच मुद्द्यावरून विरोधक आक्रमक होण्याची शक्यता आहे. तसे झाल्यास सत्तार यांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढू शकतात.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.