आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विनायक ग्रुप प्रकरण:आमदार अबू आझमींच्या अडचणीत वाढ; आयकर विभागाकडून चौकशीचे समन्स, 160 कोटी टॅक्स चोरीचा आरोप

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांना आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे. चौकशीसाठी समन्स बजाविल्याने अबू आझमी यांना आता चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे. येत्या 20 एप्रिल रोजी त्यांची वाराणसीतील विनायक ग्रुपमधील कथित गैरव्यवहार प्रकरणी चौकशी होणार आहे.

विरोधी पक्षातील अनेक नेत्यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा लागला आहे. यात काही नेत्यांना अगदी कारागृहातदेखील जावे लागले होते, यामुळे आता अबू आझमीच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाराणसी आयकर विभागाच्या वतीने त्यांना 160 कोटींच्या टॅक्स चोरी आरोपांच्या प्रकरणी चौकशीसाठी समन्स बजावले आहेत. हवालाच्या माध्यमातून अबू आझमी यांना आतापर्यंत 40 कोटी रुपये मिळाल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या प्रकरणी एका मराठी वृत्तवाहिनीने वृत्त दिले आहे.

नेमके प्रकरण काय?

आयकर विभागाकडून वाराणसीच्या विनायक ग्रुपची चौकशी सुरू होती. या चौकशीदरम्यान समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांचे नाव समोर आले आहे. विनायक ग्रुपने वाराणसीमध्ये अनेक इमारती, शॉपिंग सेंटर आणि मॉल तयार केले आहेत. या कंपनीमध्ये सर्वेश अग्रवाल, समीर दोषी आणि आभा गुप्ता हे पार्टनर आहेत. आभा गुप्ता यांचे पती गणेश गुप्ता हे अबू आझमी यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. निधनापूर्वी आधी ते समाजवादी पक्षाचे महाराष्ट्राचे महासचिव म्हणून काम पाहत होते.

चौकशीत आझमींचे नाव समोर

यात तिन्ही पार्टनरची चौकशी केल्यानंतर हा ग्रुप चार भागात विभागला गेल्याचे समोर आले. यात चौथा भाग हा अबू आझमी यांचा असल्याचे समोर आले आहे. विनायक ग्रुपला 2018 पासून 2022 पर्यंत 200 कोटी रुपयांची कमाई झालीय. यातील 160 कोटी रुपयांचा खुलासा झालाय. तर इतर 40 कोटी रुपये अबू आझमी यांना हवालाच्या माध्यमातून पाठवण्यात आल्याचा संशय आयटीला आहे. आयकर विभागाने गेल्यावर्षी अबू आझमी यांच्याशी संबंधित कुलाबा या ठिकाणी छापे टाकले होते. त्यानंतर आता अबू आझमी यांना चौकशीचे समन्स पाठवण्यात आलं आहे.