आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

चीनप्रश्नी जाब विचारणार:मोदी सरकारविरोधात काँग्रेस कार्यकर्ते उतरणार रस्त्यावर, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांची माहिती, तर आज ‘शहीदों को सलाम दिना’चे आयोजन

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • इंधन दरवाढीविरोधात २९ जूनला राज्यव्यापी आंदोलन

केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने चीनसमोर शरणागती पत्करली. चीनने २० भारतीय जवानांना हालहाल करून मारले तरीही सरकार गप्प आहे. दुसरीकडे सारा देश कोरोनाच्या गंभीर संकटाचा सामना करत असताना सातत्याने पेट्रोल-डिझेल दरवाढ करून जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचा उद्योग सुरू आहेच. चीनबाबतचे कुचकामी धोरण व अन्यायी इंधन दरवाढीविरोधात काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरून केंद्र सरकारला जाब विचारणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. थोरात म्हणाले की, चीनने सीमेवर आगळीक करून आपले २० जवान मारले. मोदी सरकारने देशाला विश्वासात न घेता माहिती दडवण्याचा प्रयत्न केला तसेच चिनी सैन्याने सीमा ओलांडली नाही अशी चीनला फायदा होणारी भूमिका घेऊन मोदींनी देशाचा तसेच आपल्या शहीद जवानांचा अपमान केला आहे. त्याचा जाब विचारण्यासाठी काँग्रेस राज्यव्यापी आंदोलन करत आहे. भारताच्या २० वीर शहीद जवानांप्रती आदर भावना व्यक्त करण्यासाठी शुक्रवारी २६ जूनला ‘शहिदों को सलाम’ दिवस पाळला जाणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधींचा पुतळा, शहीद स्मारक किंवा स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकासमोर एकत्र येऊन मेणबत्त्या पेटवून शहिदांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे. कोणतीही घोषणाबाजी न करता शांततेने हे आंदोलन केले जाणार आहे. तसेच, याच दिवशी #SpeakupForOurMartyrs ही ऑनलाइन मोहिमही सोशल मीडियावर चालवली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.

इंधन दरवाढीविरोधात २९ जूनला राज्यव्यापी आंदोलन आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती नीचांकी पातळीवर खाली आलेल्या असतानाही मोदी सरकार त्याचा थेट लाभ सामान्य जनतेला होऊ देत नाही. उलट सलग १९ दिवसांपासून पेट्रोल-डिझेलच्या किमतीत वाढच केली जात आहे. कोरोनामुळे जगणे मुश्कील झाले असताना ही भाववाढ सामान्य जनतेवर अन्याय करणारी आहे. याच पार्श्वभूमीवर सोमवारी २९ जूनला केंद्र सरकारच्या विरोधात सर्व जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी सकाळी १० ते १२ या वेळेत दोन तास धरणे आंदोलन करून इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी केली जाणार आहे. हे दोन्ही कार्यक्रम करताना फिजिकल डिस्टन्स ठेवून तसेच मास्क लावूनच करावेत याच्या सूचना सर्वांना देण्यात आलेल्या आहेत. या दिवशी #SpeakuponPetroleumPrices ही ऑनलाइन मोहीम सोशल मीडियावर चालवली जाणार आहे, असे थोरात म्हणाले. त्यानंतर या मोहिमेचा दुसरा टप्पा ३० जून ते ४ जुलै या सप्ताहात ब्लॉक व तालुका स्तरावर धरणे आंदोलन करून केला जाणार आहे.

0