आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:आदित्य रायगड, तर वडेट्टीवार राहणार सिंहगडावर! मंत्रालयाशेजारील शासकीय बंगल्यांना गडकिल्ल्यांची नावे

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाविकास आघाडीच्या सरकारने मंत्र्यांच्या शासकीय बंगल्याची नावे बदलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार मंत्रालयासमोर असलेल्या मंत्री निवासस्थानांना गडकिल्ल्यांची नावे देण्यात आली आहेत. सार्वजनिक आणि बांधकाम विभागाने तसे परिपत्रक काढले आहे. राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी मंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानाला गडकिल्ल्यांची नावे देण्याची मागणी केली होती. तसे पत्र त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले होते. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाने तशी कार्यवाही केली आहे.

जितेंद्र आव्हाड यांच्या बंगल्याचे बदललेले नाव आता शिवगड असणार आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरेंच्या बंगल्याचे नाव रायगड असेल. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या बंगल्याचे नाव सिंहगड तर उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्या बंगल्याचे नाव रत्नसिंधू असेल. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या बंगल्याचे नाव पावनगड तर महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या बंगल्याचे नाव सिद्धगड असेल. कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या बंगल्याचे नाव राजगड असेल.

मलबार हिल आणि मंत्रालय येथे मंत्र्यांसाठी स्वतंत्र निवासस्थाने आहेत. मलबार हिल येथील बंगले एेसपैस असून त्यांना नावे दिलेली आहेत. मंत्रालयासमोर म्हणजे एअर इंडिया इमारतीच्या ओळीत जे बंगले आहेत, त्यांना क्रमांक होते. त्यांचे आता नामकरण झाले आहे.

मंत्रालयाजवळच्या बंगल्यांना पसंती
मंत्रालयासमोरील बंगले शक्यतो मुंबईचे मंत्री घेतात. हे बंगले छोटे आहेत. मुंबई, ठाण्यातील मंत्री आपल्या घरी राहणे पसंत करतात. त्यामुळे ते मंत्रालयाजवळच्या बंगल्यांना पसंती देतात. आघाडी सरकारात ४३ मंत्री आहेत. काही मंत्र्यांना यशवंतराव चव्हाण सेंटरजवळच्या सुरुची-सुनीती अपार्टमेंट येथे सदनिका दिलेल्या आहेत.

अशी आहेत मंत्र्यांची शासकीय निवासस्थाने (जुने नाव-नवे नाव-मंत्री)
अ-3-शिवगड-जितेंद्र आव्हाड, अ-4 -राजगड-दादा भुसे, अ-5-प्रतापगड-के.सी.पाडवी, अ-6- रायगड-आदित्य ठाकरे, अ-9-लोहगड- रिक्त, ब-1- सिंहगड-विजय वडेट्टीवार,ब-2-रत्नसिंधू-उदय सामंत, ब-3-जंजिरा -अमित देशमुख, ब-4-पावनगड- वर्षा गायकवाड, ब-5-विजयदुर्ग-हसन मुश्रीफ, ब-6-सिद्धगड-यशोमती ठाकूर, ब-7-पन्हाळगड-सुनील केदार, क-1-सुवर्णगड-गुलाबराव पाटील, क-2-ब्रम्हगिरी-संदीपान भुमरे, क-3-पुरंदर-नीलम गोऱ्हे (परिषद उपसभापती), क-4-शिवालय-शिवसेना पक्ष कार्यालय, क-5-अजिंक्यतारा-अनिल परब, क-6-प्रचितगड-बाळासाहेब पाटील, क-7-जयगड-रिक्त, क-8-विशाळगड-रिक्त.

बातम्या आणखी आहेत...