आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकनाथ शिंदे यांनी तुरुंगाच्या भीतीने बंड केले. तुरुंगाच्या भीतीने ते मातोश्रीवर येऊन रडलेही होते, असा गौप्यस्फोट आदित्य ठाकरेंनी केलाय. हैद्राबादमधील गितम विद्यापीठाने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
महाराष्ट्रातील राजकारण, पर्यावरण, शिवसेना याबाबत या कार्यक्रमात त्यांना प्रश्न विचारण्यात आले होते. मुख्यमंत्री शिंदे यांच्या बंडाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नावर त्यांनी गौप्यस्फोट केला.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
आदित्य ठाकरे म्हणाले, एकनाथ शिंदे यांनी तुरुंगाच्या भीतीने बंड केलंय. भाजपसोबत गेलो नाही तर मी तुरुंगात असेन, असे एकनाथ शिंदे मातोश्रीवर येऊन म्हणाले होते. एकनाथ शिंदे त्यावेळी मातोश्रीवर येऊन रडले होते, असे आदित्य ठाकरे म्हणाले.
शिवसेना सोडून गेलेले 40 आमदार हे स्वत: साठी आणि पैशांसाठी गेले आहेत. केंद्रीय यंत्रणांकडून त्यांना अटक होणार होती, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
दरम्यान, जवळपास आठ महिन्यांपूर्वी शिवसेनेत फूट पडली. विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेच्या 40 आमदारांनी बंड केले. या बंडामुळे मुख्यमंत्रीपदावरून उद्धव ठाकरे यांना पायउतार व्हावे लागले.
राजकीय वर्तुळात खळबळ
आदित्य ठाकरे यांच्या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. अंजली दमानिया यांनी अजित पवार लवकरच भाजपमध्ये जातील असे वक्तव्य केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपच्या जवळीकीची चर्चा रंगलेली असतानाच आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्यामुळे बंडखोरीवर आरोप- प्रत्यारोप वाढण्याची शक्यता आहे.
सुषमा अंधारेंची प्रतिक्रीया
आदित्य ठाकरेंच्या गौप्यस्फोटानंतर सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रीया दिली आहे. त्यावेळी त्या म्हणाल्या, बंडात हिंदुत्वाचा मुद्दा कधीच नव्हता. हे उघड झालेय. असे त्या म्हणाल्या.
ज्या ज्या लोकांच्या ईडी आणि सीबीआयच्या फाईल होत्या. त्या फाईल्स उघडल्या जाण्याची भीती होती. त्यामुळे त्यांना भीती वाटत होती. भाजपची ही मोडस ऑपरंडसी आहे. आमच्यासोबत आलात तर आम्ही तुम्हाला वॉशिंग मशिनमध्ये धुऊन काढू आणि दोषमुक्त करू. पण, जर आमच्यासोबत आला नाहीत तर जेलमध्ये . एकतर भाजपात या नाहीतर जेलमध्ये जा. ही भूमिका कित्येक उदाहरणे देऊन स्पष्ट करता येतील. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या भूमिकेत काही वावगे नाही, असे सुषमा अंधारे यांनी स्पष्ट केले.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.