आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशिंदे आणि फडणवीस सरकारचे नाट्य एक महिन्याचे असून, तुम्ही आज लिहून घ्या की शिंदे सरकार कोसळणार, गद्दारी कधी महाराष्ट्र खपवून घेत नाही. तसेच ठाकरे कुटुंबीयांना कुणीही राजकारणातून संपवू शकत नाही, असे म्हणत शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला. ते आज सिंधुदुर्गात शिवसंवाद यात्रेत बोलत होते.
कोकणातील ज्या भागात कधी विकास झाला नव्हता, तिथे आपण रस्ते, वीज उपलब्ध करून दिली. पण आता राज्याचे वातावरण जर बघितले तरी असे वाटते की, या कामांकडे कोणाचेच लक्ष नाही. राज्यात दोन जणांचे जंब्मो मंत्रिमंडळ असून, त्यात मुख्यमंत्री कोण उपमुख्यमंत्री कोण हे कळतच नाही. या सरकारचे लक्ष महाराष्ट्रावर नाही, जनतेवर नाही, त्यांचे लक्ष फक्त घाणेरड्या राजकारणावर आहे. मी माझ्या आयुष्यात कधीही असे घाणेरडे राजकारण बघितले नाही, असे म्हणत आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर टीका केली.
हे तर बेईमानीचे सरकार
पुढे आदित्य ठाकरे म्हणाले की, पक्ष फोडा, गद्दारी करा ही महाराष्ट्राची संस्कृती नव्हती. ज्या माणसाने तुम्हाला घडवले, तुम्हाला राजकीय ओळख दिली, सगळं काही दिले त्या माणसाच्या पाठित खंजीर खुपसण्यात आला, अशी महाराष्ट्राची ओळख झाली आहे. हे सरकार गद्दारांचे सरकार असून, सर्व जण बेईमान आहेत. राज्यात आणि देशात बेरोजगारी वाढत आहे. महागाई वाढत आहे. मात्र, केंद्राकडून महाराष्ट्राला संपवण्याचं प्रयत्न सुरू आहे. देशात आणि राज्यात फक्त आणि फक्त पक्ष फोडण्याचे काम सुरू आहे.
राज्याचे तुकडे करायचे
उद्धव ठाकरे हे गेली अडीच वर्ष प्रत्येकाचे मुख्यमंत्री म्हणून काम करत होते. प्रत्येकाला असे वाटायचे की, हा माझा कुटुंबप्रमुख आहे. कुठेही वाद, दंगल निर्माण झाली नाही. पण त्यात महाराष्ट्रात चांगलं चाललेले असताना काही लोकं महाराष्ट्राला खाली पाडू इच्छितात, राज्याचे पाच तुकडे करू इच्छितात. मराठी माणसाची एकजुट तोडायची, असे त्यांचे कटकारस्थान आहे. मात्र, मी त्यांना एकच सांगू इच्छितो की, ठाकरे कुटुंब कधीही संपणार नाही कारण, ठाकरे परिवार येथे उभा आहे, असेही आदित्य ठाकरे म्हणाले.
40 गद्दार फसले
जो काही बुलंद आवाज आहे. त्यांचा आवाज दाबून टाकायचा, महाराष्ट्राला दाबून टाकायचे म्हणजे एकदा की महाराष्ट्र संपला आपले धंदे सुरू करायचे. त्याच धंद्यात 40 गद्दार फसले. पण त्यांच्याबाबत माझ्या मनात कुठलाही राग नसल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले.
राजीनामे द्या, निवडणुका लढवा
महाराष्ट्राचा आवाज दाबण्यासाठी हे सर्व सुरू आहे. संजय राऊतांची अटक हे कटकारस्थान आहे, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे. बंडखोरी झालेल्या 40 जागांवर निवडणुका घ्या, सत्ता जिंकते की सत्य जिंकते कळू द्या, असे आव्हान आदित्य ठाकरेंनी दिले आहे. ठाकरे परिवार कधीही संपणार नाही. समोर असलेले हे ठाकरे परिवार आहे. कोकणाचा आवाज म्हणजे शिवसेनेचा आवाज आहे. बंडखोरांनो राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा असे म्हणत त्या 40 लोकांसाठी अजूनही मातोश्रीचे दरवाजे अजूनही उघडे आहेत.
शिवसंवाद यात्रेचा दुसरा टप्पा
एकीकडे संजय राऊत यांच्या अटकेमुळे शिवसेनेला हादरा बसला असताना शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आज तळकोकणातून त्यांच्या शिवसंवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करत आहेत. आदित्य ठाकरे आज सकाळी चिपी विमानतळावर पोहोचले. तर संध्याकाळी आदित्य ठाकरे यांचा कोल्हापुरात मेळावा आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.