आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबई:चुकीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी आदित्य ठाकरे यांच्या हाती 'धनुष्य’, काय म्हणतात राजकीय पक्ष

मुंबई6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

२०१० चा शिवाजी पार्कवरील दसरा मेळावा. या मेळाव्यातच आदित्य ठाकरे यांच्या गळ्यात युवा सेनेच्या अध्यक्षपदाची माळ टाकण्यात आली. सध्याचे चाणक्य मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काळाची पावले ओळखत आपल्या मुलाला राजकारणात योग्य वेळी उतरवले. त्या वेळी अनेकांनी आदित्य यांची टिंगलटवाळीही केली. आता आदित्य ठाकरे हे सक्रिय राजकारणी तर आहेतच, मात्र मंत्री म्हणूनही आता ते राज्याच्या राजकारणात छाप पाडताना दिसत आहेत. उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व स्वीकारण्यास सेना नेत्यांनी वेळ घेतला होता. हेच हेरून आता उद्धव ठाकरे आदित्यच्या बाबत ही चूक करू इच्छित नाहीत. त्यामुळेच सेना प्रवक्ते संजय राऊत यांनी आगामी लोकसभा निवडणुका आदित्य यांच्या नेतृत्वात लढवण्यात येणार असल्याचे जाहीर केले.

काय म्हणतात राजकीय पक्ष
राष्ट्रवादी : आदित्य ठाकरेंचे नेतृत्व सिद्ध

दमण लोकसभा पोटनिवडणुकीत आदित्यने राज्याबाहेर सेनेचे खाते उघडले. आदित्यच्या नेतृत्वात निवडणुका लढवण्याच्या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे सांगत राष्ट्रवादीचे प्रवक्ते मंत्री नवाब मलिक यांनी सेनेच्या निर्णयाचे समर्थन केले आहे.

भाजपसोबत संघर्ष वाढेल ?
- शिवसेना हिंदुत्ववादी पक्ष आहे. सेनेने आजपर्यंत लोकसभेला केवळ दिव-दमणला एक उमेदवार उभा केला होता.
- लोकसभा लढवण्याची तयारी होत आहे. भाजप व सेना यांच्यातील संघर्ष वाढण्याची शक्यता सेना नेते खासगीत सांगतात.
- स्थानिक पक्षही आदित्य यांच्या स्पर्धेत असण्याची शक्यता आहे.

उद्धव ठाकरेंकडेच धुरा
- दिव-दमणच्या लोकसभा पोटनिवडणुकीत आदित्य प्रथम महाराष्ट्राबाहेर प्रचाराला गेले.
- आता गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये आदित्य ठाकरे सक्रिय आहेत.
- आदित्य नेतृत्व करणार असले तरी पक्षप्रमुख म्हणून उद्धव ठाकरे यांच्या हातीच नेतृत्वाची धुरा कायम असेल.

कशासाठी हा निर्णय?
- उद्धव यांचे नेतृत्व सेना नेत्यांनी स्वीकारण्यास वेळ घेतला होता.
- तशीच चूक आता ठाकरे कुटुंबीयांना नको आहे.
- आदित्य यांचा चेहरा तरुणांना आकर्षित करणारा.
- आदित्य यांचा पर्यावरण, पर्यटन क्षेत्रात विशेष अभ्यास आहे.
- सेना पक्ष आक्रमक. मात्र, आदित्य समजून घेणार नेते.

काँग्रेस : या निर्णयाचे स्वागतच आहे
शिवसेना पक्ष हिंदुत्ववादी असला तरी आता थोडा मवाळ झालाय. शिवसेना देशभर गेली तर भाजपचा ढोंगीपणा जनतेला कळून येईल, असा दावा करत काँग्रेस शिवसेनेच्या निर्णयाचे स्वागत करत असल्याचे प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी दिव्य मराठीला बोलताना सांगितले.

भाजप : महाराष्ट्रात यश मिळवून दाखवा
आपल्या देशामध्ये लोकशाही आहे. तसेच सर्वच निवडणुका लढवण्याचा सर्वांना अधिकार आहे. पण किमान शिवसेनेने महाराष्ट्रात तरी स्वत:च्या चेहऱ्यावर यश मिळवून दाखवावे. त्यानंतर नेतृत्व सिद्ध करावे, असे आव्हान भाजपचे राज्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी दिले.

बुजुर्गांचा अडथळा : अनिल परब, अनिल देसाई, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई असे सेनेत बुजुर्ग नेते मुख्य भूमिकेत आहेत. हे नेते आदित्यचे नेतृत्व स्वीकारण्याची शक्यता नाही. सेनेचे लोकप्रतिनिधी सामान्य कुटुंबातील आहेत. त्यांच्या आणि आदित्यमध्ये धोरणात्मक पातळीवर दरी आहे. तरुणांना संधी देऊन आदित्यचा प्रवास सुकर करण्याचे ठाकरे कुटुंबीयांचे प्रयत्न आहेत.

आदित्यचा प्रवास : वयाच्या २० व्या वर्षी २०१० मध्ये युवा सेना अध्यक्ष. २०१४ मध्ये भाजपबरोबर युतीच्या जागावाटपाचे नेतृत्व. २०१७ मध्ये राज्यभर जनआशीर्वाद यात्रा काढली. २०१९ मध्ये वरळी मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवली. २०२० मध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ. २०२२ च्या मुंबई पालिका निवडणुकांचे नेतृत्व करणार. २०२४ मध्ये लोकसभा निवडणुकांचे नेतृत्व करण्याचे केले जाहीर.

बातम्या आणखी आहेत...