आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यभरात राज्यपाल भगतसिंह कोश्यारींविरोधात आंदोलन होऊनही त्यांना पदावरून हटवले जात नाही. भगतसिंह कोश्यारींना छुपा पाठिंबा आहे का?, असा खोचक सवाल आज आदित्य ठाकरे यांनी भाजपला केला.
तसेच, राज्यात महिलांवरील अत्याचारात वाढ होत आहे. नुकतीच पालघरमध्ये महिला अत्याचाराची दुर्दैवी घटना घडली. अशा घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. राज्यात कायदा-सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे, अशी तोफही आदित्य ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर डागली.
कोश्यारींना पदमुक्त करायला हवे होते
आज मुंबईत पत्रकारांशी बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबाबत एकदा नव्हे तर दोनदा अवमानजनक वक्तव्य केले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुलेंबाबतही भगतसिंह कोश्यारींनी अवमानजनक वक्तव्य केले. आतापर्यंत भगतसिंह कोश्यारींना पदमुक्त करायला हवे होते. किंवा भगतसिंह कोश्यारींनीच राजीनामा द्यायला हवा होता.
अद्याप माफी मागितली नाही
आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवून आपण स्वप्नातही शिवरायांचा अपमान करू शकत नसल्याचे म्हटले आहे. मात्र, भगतसिंह कोश्यारींनी स्वप्नात नव्हे तर प्रत्यक्षात शिवरायांचा अपमान केला आहे. वर त्याविषयी बोलताना भगतसिंह कोश्यारींच्या बोलण्यात कुठेही पश्चाताप जाणवत नाही. भगतसिंह कोश्यारींनी याबाबत एकदाही अद्याप माफी मागितली नाही. ही फार दु:खाची बाब आहे.
मविआच्या मोर्चा अराजकीय
आदित्य ठाकरे म्हणाले, राज्यपाल भगतसिंह कोश्यारींविरोधात महाविकास आघाडीतर्फे 17 डिसेंबररोजी मुंबईत भव्य मोर्चा काढला जाणार आहे. हा मोर्चा राजकीय नाही. तर जो कोणी महाराष्ट्रप्रेमी आहे, अशा प्रत्येकाने या मोर्चात सहभागी झाले पाहीजे, असे आवाहनही आदित्य ठाकरेंनी केले.
शरद पवारांच्या धमकी पॅटर्न
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आल्याचे समोर आले आहे. यावर आदित्य ठाकरे म्हणाले, या धमकीचा पॅटर्न बघायला हवा. सत्तेत येताच शिंदे सरकारने विरोधी नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली. त्यानंतर आमदार भास्कर जाधवांच्या घरावर हल्ला झाला. शिंदे गटाच्या एका आमदाराने तर पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार केला. तरी त्याच्यावर कारवाई झाली नाही. त्यानंतर आता मविआच्या प्रमुख नेत्यांना धमक्या येत आहे. यावरून राज्यात कायदा सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाल्याचे स्पष्ट होत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.