आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'सत्ता'कारण:आदित्य ठाकरे दिल्ली दौऱ्यावर, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची घेतली विशेष भेट; राजकीय घडामोडींवर चर्चा

दिल्ली21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात वेगाने राजकीय घडामोडी घडत आहेत. भाजप आणि शिवसेना सरकार विरोधात महाविकास आघाडी तर केंद्रात मोदी सरकारविरोधात मोट बांधण्याचे काम सुरु आहे. नुकतीच नितीश कुमारांनी मुंबईत जाऊन मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. आता आदित्य ठाकरेंनी दिल्लीला जात मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भेट घेतली आहे.

आदित्य ठाकरे यांच्या भेटीबाबत अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. अरविंद केजरीवाल यांनी म्हटले की, आज निवासस्थानी आदित्य ठाकरेंचा पाहुणचार करण्याची संधी मिळाली. देशाच्या सध्याच्या राजकीय घडामोडींवर त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाली.

सत्ताबदलासाठी विरोधक एकत्र

देशात सध्या 2024 मध्ये सत्ताबदलासाठी विरोधक एकत्र आले आहेत. यासाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांनी दोनच दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची मानली जात आहे. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची देखील भेट घेतली आहे.

राज्यघटना धोक्यात

आदित्य ठाकरे यांनीही ट्विट करत अरविंद केजरीवाल यांच्या सोबतच्या भेटीचे छायाचित्र शेअर केले आहे. आदित्य ठाकरे म्हणाले, आज सकाळी मी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल त्यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी खासदार संजय आझाद आणि खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचीही उपस्थिती होती. आम्ही विविध मुद्द्यांवर चर्चा केली. लोकशाही आणि आपली राज्यघटना धोक्यात आहे आणि आपण तिचे सर्व प्रकारे संरक्षण केले पाहिजे.

भाजपविरोधात विरोधकांची मोट

काल मुंबईत ठाकरे गटाची बैठक झाली तर आज महाविकास आघाडीमधील प्रमुख नेत्यांची बैठक होणार आहे. भाजपविरोधात विरोधकांचा मजबूत पर्याय उभा करण्यासाठी विरोधक एकत्र आले आहेत. याच पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे-अरविंद केजरीवाल यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. यापूर्वी अरविंद केजरीवाल यांनीही मुंबईत येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती.