आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दसरा मेळाव्यात आव्वाज कुणाचा?:शिवाजी पार्कवर आदित्य ठाकरेंची तोफ धडाडणार; बीकेसीवर अयोध्येचे महंत उपस्थिती लावण्याची शक्यता

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदा मुंबईत उद्या होणारे दसरा मेळावे दणक्यात होणार आहेत. शिवाजी पार्कवरील मेळाव्यात उद्धव ठाकरेंसोबतच आदित्य ठाकरेंची तोफ धडाडणार आहे. तर बीकेसी पार्कवरील शिंदे गटाच्या मेळाव्यात अयोध्येचे महंत उपस्थिती लावण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.

दसरा मेळावे जोरदार करण्याचा ठाकरे आणि शिंदे गटानेही चंग बांधला आहे. दोन्ही सभा ठिकाणी राज्यभरातून हजारो कार्यकर्ते आणण्यासाठी तयारी पूर्णत्वास केलीय.

अशी आहे तयारी?

शिवसेनेत झालेल्या बंडानंतर आता एकीकडे खरी शिवसेना कोणाची, याचा वाद सुरू आहे. पक्षचिन्हावर निवडणूक आयोग लवकरच सुनावणी घेण्याची शक्यताय. त्यासाठी उद्धव ठाकरे यांना म्हणणे मांडण्याची उद्यापर्यंतची मुदत दिलीय. या साऱ्या पार्श्वभूमीवर मुंबईत होणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाने सर्वस्व पणाला लावले आहे. जास्तीत जास्त गर्दी जमवण्यासाठी ठिकठिकाणाहून शेकडो गाड्या बुक केल्यात.

विशेष आकर्षण काय?

शिवाजी पार्कवर होणाऱ्या दसऱ्या मेळाव्यात यंदा उद्धव ठाकरे बोलणार आहेतच. सोबतच आदित्य ठाकरे यांचे विशेष आकर्षण राहणार आहे. शिवसेनेतल्या बंडानंतर आदित्य यांनी मोठ्या खंबीरपणे परिस्थिती हाताळली. त्यांच्या वक्तृत्वालाही या काळात धार चढली. येणाऱ्या काळात शिवसेनेतली पोकळी भरून काढण्याचे शिवधनुष्य त्यांनी उचललेय. विशेषतः त्यांचे अभ्यासपूर्ण बोलणे कार्यकर्त्यांना भावते आहे. त्यांच्या प्रत्येक सभेला प्रचंड गर्दी होतेय. दुसरीकडे शिंदे यांच्या दसऱ्या मेळाव्यात अयोध्येचा महंत येण्याची शक्यता वर्तवली जातेय.

हिंदुत्वावरून चढाओढ

उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यावरची लढाई दोन पातळीवर लढवली जातेय. एक तर खरे हिंदुत्व कोणाचे आणि त्यातही खरी शिवसेना कोणाची. शिवसेनेचा कणा हिंदुत्व असल्यामुळे माझे हिंदुत्व श्रेष्ठ की तुझे याची चढाओढही या दोघांमध्ये लागलीय. त्यामुळेच शिंदे यांनी अयोध्येच्या महंतांना बोलवण्याची तयारी केल्याचे समजतेय.

हजारो गाड्या बुक

शिंदे सेनेकडून बीकेसीवर होणाऱ्या मेळाव्यासाठी हजारो बस बुक करण्यात आल्या आहेत. आजपासूनच हे कार्यकर्ते मुंबईत कूच करण्याची शक्यताय. दुसरीकडे ठाकरेंचेही हजारो कार्यकर्ते मुंबईत धडकणार आहेत. त्यामुळे उद्या मुंबईत अभूतपूर्व गर्दी उसळणार आहे. यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त केलाय.​​​​​​

बातम्या आणखी आहेत...