आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य ठाकरेंचे बंडखोरांना प्रत्युत्तर:प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसला, गद्दारी महाराष्ट्राला पटलेली नाही

3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज ज्यांना पायऱ्यांवर उभे केले होते त्यांची मला कीव येत आहे. त्यांना मंत्रिपदासाठी माझ्याविरोधात बोलावं लागतय. बंडखोरांनी जी काही निदर्शने झाली त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर नैराश्य दिसले, अशी टीका युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी आज विधानभवन परिसरात केली.

आदित्य ठाकरे म्हणाले, शिवसेनेला मिळणारा प्रतिसाद बघून त्यांच्या मनात भीती दिसली. गद्दारी या महाराष्ट्राला पटलेली नाही. जनतेचा कुठेही त्यांना पाठिंबा नाही. एका चांगल्या, प्रामाणिक माणसाच्या पाठीत खंजीर खुपसून ते गेलेत. त्यामुळेच त्यांना पायऱ्यांवर अशी घोषणाबाजी करावी लागत आहे.

पुढे बोलतांना ते म्हणाले, शेतकरी, महिला, तरुणांचे जे प्रश्न आहेत ते घेऊन जर हे लोक पायऱ्यावर उभे राहिले असते तर मला त्यांचे कौतुक वाटले असते. दहीहंडी मंडळांसाठी जीआर काढू अशी घोषणा केली. मात्र यासंबंधीचा जीआर अजूनपर्यंत काढलेला नाही. मंडळांचे लोक आम्हाला येऊन भेटत आहेत.

आम्ही तुम्हाला काय कमी केलं?

आदित्य ठाकरे म्हणाले, आज ते माझ्यावर, उद्धव साहेबांवर, शिवसैनिकांवर टीका करत आहेत पण मला त्यांना विचारायचय की आम्ही तुम्हाला काय कमी केलं? आणि काय कमी दिलं. अशी काही खाती जी कधीही कुठल्या मुख्यमंत्र्याने सोडलेली नव्हती. ती खाती यांना दिली. तरी यांनी गद्दारी केली. आज त्यांच खर रुप दिसत आहे.

पर्यटन म्हणजे जगाची वारी नाही

शिंदे गटाच्या आमदारांनी आज झळकावलेल्या आदित्य ठाकरेंच्या पोस्टर्सवर आदित्य ठाकरेंना एका घोड्यावर उलटे बसवलेले दाखवले आहे. यातून युवराजांची दिशा चुकलेली आहे, अशी टीका शिंदे गटाने केली आहे. पर्यटन खाते घेऊन घरातच बसून केला कहर सत्ता गेल्यावर पर्यटनाची आली लहर, अशाप्रकारचा मजकूर यावर आहे.

याला आदित्य ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले, पर्यटन खाते घेऊन जगाची वारी करायची नसते. आपण पर्यटक नसतो. आमच्यावर अशा कितीही टीका केल्या तरी आम्ही फिरत राहू. आमचे दौरे सुरु राहतील. आमचा आवाज कितीही दाबण्याचा प्रयत्न झाला तरी शिवसेना उभी राहिल.

बेगाणी शादी मे अब्दुल्ला दिवाणा

गोगावले यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देतांना आदित्य ठाकरें म्हणाले, गद्दारांचा मुखवटा फाडू. आधी आम्ही त्यांच्या सोबत फिरायचो. आता त्यांना दिल्लीला पायी जावे लागते. बेगाणी शादीमे अब्दुल्ला दिवाणा असं प्रविण दरेकरांच झालय. यांना काय देणघेण आहे. आम्ही 40 आमदारांवर बोलत आहोत. असे म्हणत त्यांनी दरेकरांवर निशाणा साधलाय.

राजीनामा द्या, निवडणुकीला सामोरे जा

हे रावणराज्य आहे रामराज्य नाही. महाराष्ट्रात खूप समस्या आहेत. शेतकऱ्यांच्या समस्या आहेत. मात्र त्याकडे यांचे लक्ष नाही. यांनी महाविकास आघाडीचे शेतकरी, तरुणांचे, महिलांचे सरकार निर्लज्जपणे पाडले. 50 खोक्यांचा अर्थ आज गल्लीगल्लीतील लहान मुलांनाही माहित आहे. चला सगळे निवडणुकीला सामोरे जाऊ. कोणाची केवढी लोकप्रियता आहे, कळेल. मी पण निवडणुकीला सामोरे जाईल. रस्त्यांसाठी कदर करणारे कोणीच नाही. महाविकास आघाडीत सगळीकडे प्रतिनिधी होते. जे काही आहे ते जनता ठरवेल.

बातम्या आणखी आहेत...