आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरेंच्या मुखपत्रात शिंदेंची जाहिरात:खोके पोहोचले का?, मनसेची टीका; खोके मिळाल्यानेच तुम्ही आता शांत, दानवेंचे प्रत्युत्तर

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना वृत्तपत्रात आज शिंदे सरकारची फुल पेज जाहिरात छापण्यात आली आहे. सत्तासंघर्षामुळे ठाकरे व शिंदे-भाजपमधून विस्तवही जात नसताना या जाहिरातीची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या जाहिरातीवरून 'सामनामध्ये खोके पोहोचले का?', असा खोचक सवाल ठाकरे गटाला केला आहे. तर ठाकरे गटाचे नेते व विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही खोक्यांची सवय मनसेलाच आहे. त्यामुळेच ते आता मशिदीसमोर हनुमान चालिसा वाजवत नाही, असे प्रत्युत्तर दिले आहे.

अनधिकृत सरकारची जाहिरात कशी चालते?

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी सांगितले की, ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे रोज शिंदे सरकारवर खोक्यांची टीका करत आहे आणि आता त्याच सरकारची जाहिरात घेत आहे. या जाहिरातीमुळे ठाकरेंचे खरे स्वरूप जनतेसमोर आले आहे. आदित्य ठाकरे तर वारंवार राज्यातील शिंदे-फडणवीस सरकार अनधिकृत असल्याचे म्हणत आहेत. याच अनधिकृत सरकारची अधिकृत जाहिरात मग ते कसे काय घेतात.

पैशांसाठी तत्त्वे बाजूला

संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे की, ठाकरे आता आपली तत्त्वे बाजूला करून पैसे गोळा करण्याचे काम करत आहे. सरकार हे सगळ्याच वृत्तपत्रांना जाहिराती देत असते. त्यामुळे सरकारकडून काही चुकीचे झाले नाही. मात्र, सामना हे सामान्य वृत्तपत्र नाही. ते ठाकरेंचे मुखपत्र आहे. त्याचे संपादक उद्धव ठाकरे आहे. त्यामुळे एकीकडे खोक्यांवरून टीका करताना त्याच सरकारकडून खोके घेणे, ही ठाकरेंची दुटप्पी भूमिका आहे.

मनसे आता शांत का?

दुसरीकडे, ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनीही मनसेला प्रत्युत्तर दिले आहे. अंबादास दानवे म्हणाले की, मनसेलाच खोक्यांची सवय लागली आहे. त्यामुळे ते अशी टीका करत आहे. खोके भेटल्यामुळेच मनसेने टोलनाक्याविरोधातील आंदोलन बंद केले. आता हनुमान चालिसा, मशिदींवरील भोंग्याविरोधातील आंदोलनही मनसेने खोके भेटल्यामुळेच गुंडाळले आहे.

वावगे काहीच नाही

अंबादास दानवे म्हणाले, सामना हे आमचे मुखपत्र असले तरी ते एक लिस्टेड वृत्तपत्र आहे. वृत्तपत्रांना जाहिराती हव्या असतात आणि सरकारच्या जाहिराती या वृत्तापत्रांचा सर्वात मोठा आर्थिक स्रोत असतात. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने सामनाला जाहिरात दिली असेल तर त्यात काही वावगे नाही. आणि आम्ही ती स्वीकारली त्यातही काही चूक नाही.

बातम्या आणखी आहेत...