आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा“विश्व मराठी संमेलनास राज्य शासन पूर्ण पाठबळ देईल आणि दर दोन वर्षांनी राज्यातील वेगवेगळ्या शहरांमध्ये हे संमेलन भरवण्यात येईल”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ‘मराठी तितुका मेळवावा’ या पहिल्या विश्व मराठी संमेलनाचे बुधवारी मुंबई येथील नॅशनल स्पोर्टस् क्लब ऑफ इंडिया, वरळी येथे उद्घाटन झाले. या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला विधासभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शिंदे म्हणाले, “मुंबईमध्ये मराठी माणसाला ताठ मानेने जगता आले पाहिजे. मराठी माणूस या मुंबईमधून बाहेर जाता कामा नये. मुंबईतून बाहेर गेलेल्या मराठी माणसालादेखील मुंबईत परत कसे आणता येईल, यासाठी देखील प्रयत्न करण्यात येतील. आज मुंबईतले हे विश्व संमेलन खऱ्या अर्थाने आपल्या मराठी माणसांना एकत्र आणण्याची एक सुरुवात आहे”. “जी भाषा सर्वांना जोडते, जी भाषा सर्वांना सामावून घेते आणि जी भाषा जात, धर्म, पंथ पलिकडची माणुसकी शिकवते, माणुसकी जपते, तीच भाषा खऱ्या अर्थाने विश्वाची बनते आणि हे सर्व गुण आपल्या मराठी भाषेमध्ये अगदी ठासून भरलेले आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकरात लवकर देण्यात यावा, यासाठी केंद्राकडे देखील पाठपुरावा करण्यात येत आहे. मराठी भाषा धोरणाची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे, तसेच मराठी साहित्य संमेलनाच्या अनुदानाच्या रकमेमध्ये वाढ करण्यासाठी शासन सकारात्मक आहे”. “मराठी माणूस आपल्या कर्तृत्वाने आज जगभरामध्ये सगळीकडे यशाची शिखरं गाठतोय आणि जगाच्या कोणत्याही कोपऱ्यामध्ये आपण गेलो तरी मराठी भाषा कानावर पडते. या सर्व मराठी माणसांना एकत्र आणणारा दुवा म्हणून हे विश्व मराठी संमेलन आहे, असेही त्यांनी या वेळी सांगितले.
मराठी ज्ञानभाषा व्हावी : देवेंद्र फडणवीस “उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण आणि ज्ञानाधारित अर्थव्यवस्थेचे शिक्षण हे आपल्या मातृभाषेमध्ये होत नाही, तोपर्यंत आमच्या भाषा या वैश्विकभाषा होऊ शकणार नाही, मराठी ही ज्ञानभाषा होणे आवश्यक आहे”, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वेळी बोलताना केले.
मुंबईतून मराठी हद्दपार होणार नाही : केसरकर मराठी भाषा विभागाचे मंत्री दीपक केसरकर म्हणाले, “मुंबई म्हणजे मराठीची राजधानी आहे. येथे मराठी भाषा टिकली पाहिजे. मुंबईतून मराठी हद्दपार होणार नाही, हा शासनाचा निर्धार आहे. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार वैश्विक स्तरावर होण्यासाठी ‘मराठी तितुका मेळवावा’ या उदात्त हेतूने मराठी भाषा विभागामार्फत मुंबईत विश्व संमेलन आयोजित करण्यात आले आहे”.
जेवणामध्ये मराठवाड्याच्या पदार्थांचा समावेश मराठी संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या जात्यावरच्या ओव्या, रांगोळीने समजलेले तुळशी वृंदावन, खलबत्ता वापरत असणाऱ्या मराठी गृहीणींचे देखावे, पुस्तक विक्रीसाठी वेगवेगळी दालने खानदेशी, वऱ्हाडी, मराठवाडा, कोकणी अशा विविध भागातील खाद्यपदार्थांचा जेवणामध्ये समावेश होता. या वेळी उपस्थितांनी वेगवेगळ्या पदार्थाचा स्वाद घेतला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.