आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

NCRBच्या अहवालातील धक्कादायक माहिती:शेतकरी आत्महत्यांनंतर विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांतही महाराष्ट्र पहिला

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शेतकरी आत्महत्यांत महाराष्ट्र देशात अग्रेसर असतानाच आता विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांतही तो इतर राज्यांपेक्षा पुढेच असल्याची बाब उघड झाली आहे. सन २०२१ मध्ये विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण ४.५ टक्क्यांनी वाढले आहे.

नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरोने (एनसीआरबी) नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालातून ही बाब समोर आली असून देशात सर्वाधिक विद्यार्थ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आहेत. २०२१ मध्ये महाराष्ट्रात १ हजार ८३४ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली असून देशातील इतर राज्यांच्या तुलनेत हे प्रमाण सर्वाधिक आहे. महाराष्ट्रानंतर मध्य प्रदेश दुसऱ्या स्थानी असून तेथे १ हजार ३०८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे. तामिळनाडूमध्ये १ हजार २४६ मृत्यू झाले.

एनसीआरबीच्या अहवालातील नोंदीनुसार २०२० आणि २०२१ मध्ये कोरोनाकाळात आजारादरम्यान विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांमध्ये प्रचंड मोठी वाढ झाली आहे. गेल्या ५ वर्षांमध्ये आत्महत्येच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र या अहवालातून स्पष्ट झाले आहे. २०२० मध्ये १२ हजार ५२६ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, तर २०२१ मध्ये ही संख्या १३ हजार ८९ झाली आहे. २०१७ आणि २०१९ या कालावधीत देशातील एकूण आत्महत्यांपैकी विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण अनुक्रमे ७.४० ते ७.६० टक्के होते. ते २०२० मध्ये ८.२० टक्क्यांपर्यंत वाढले. २०२१ मध्ये मात्र थोडी घट होऊन हे प्रमाण ८ टक्क्यांवर आले. या अहवालात विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांचे नेमके कारण स्पष्ट करण्यात आलेले नाही.

परीक्षेतील अपयश हेच मुख्य कारण

एनसीआरबीच्या अहवालानुसार १८ वर्षांखालील १० हजार ७३२ तरुणांनी आपले जीवन संपुष्टात आणले. यातील ८६४ विद्यार्थी परीक्षेत अपयश आल्याने त्यांनी आत्महत्या केल्याचे नमूद आहे. याशिवाय ‘कौटुंबिक समस्या’ हेही या वयोगटातील आत्महत्येचे सर्वात मोठे कारण दिसून आले. २०१७ पासून विद्यार्थ्यांच्या आत्महत्येच्या प्रमाणामध्ये ३२.१५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. २०१७ मध्ये एकूण विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांची संख्या ९ हजार ९०५ होती.

आत्महत्या करणाऱ्यांत विद्यार्थिनी कमी

एनसीआरबीच्या अहवालानुसार विद्यार्थिनींच्या आत्महत्येच्या प्रमाणाची पाच वर्षांतील आकडेवारी ४३.४९ टक्के इतकीच िदसून आली आहे. एकूण विद्यार्थ्यांच्या आत्महत्येपैकी पुरुष विद्यार्थ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण अधिक म्हणजे ५६.५१ टक्के होते. २०१७ मध्ये ४ हजार ७११ विद्यार्थिनींनी आत्महत्या केली होती, तर २०२१ मध्ये अशा मृत्यूंची संख्या ५ हजार ६९३ इतकी होती. एकूण आत्महत्याग्रस्तांपैकी केवळ ४.६ टक्के पदवीधर किंवा उच्च शिक्षित होते, असेही अहवालात नमूद करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...