आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काम बंद आंदोलन:मुख्यमंत्र्यांशी सकारात्मक चर्चेनंतर मार्डचा संप मागे, त्वरित तोडगा काढा : उद्धव ठाकरे

नागपूर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाकाळातील निवासी डाॅक्टरांची रुग्णसेवा व झालेले शैक्षणिक नुकसान लक्षात घेता वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी दिलेल्या शैक्षणिक शुल्क माफी आश्वासनाची पूर्ती न झाल्यामुळे निवासी डाॅक्टरांनी १ आॅक्टोबरपासून सुरू केलेले काम बंद आंदोलन मुख्यमंत्र्यांशी झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर मागे घेण्यात आल्याचे मार्डचे अध्यक्ष ज्ञानेश्वर ढोबळे पाटील यांनी जाहीर केले.

निवासी डाॅक्टरांची संघटना असलेल्या महाराष्ट्र स्टेट असोसिएशन आॅफ रेसिडेंट डाॅक्टर्स संघटनेने (मार्ड) सोमवारी आयसीयू व कोरोना सेवा वगळता सर्व कामे बंद ठेवण्याचे जाहीर केले होते. त्याची दखल घेत सोमवारी मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक झाली. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, डीएमईआर संचालक डाॅ. दिलीप म्हैसेकर आदी उपस्थित होते. मार्डच्या सर्व मागण्यांची पूर्तता महिनाभरात केली जाईल, असे बैठकीत मान्य करण्यात आले.

राज्यातील सर्व शासकीय व महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डाॅक्टरांना सन्मान निधी देण्यात येईल, शैक्षणिक फी माफी तांत्रिकदृष्ट्या अशक्य असल्याने तज्ज्ञांशी चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, राज्यातील सर्व शासकीय व महानगरपालिका वैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृहांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यात येईल, आदी आश्वासने या बैठकीत देण्यात आली. या वेळी वित्त विभाग तसेच पालिकेस तांत्रिक बाबींचा अभ्यास करून योग्य तो तोडगा काढण्यासाठी त्वरित पावले उचलावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी या वेळी अधिकाऱ्यांना दिले.

बातम्या आणखी आहेत...