आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यपालांविरोधात मराठा क्रांती मोर्चा आक्रमक:औरंगाबाद, मुंबईत आंदोलन; राजीनामा न दिल्यास राजभवनावर धडकण्याचा इशारा

औरंगाबाद/ मुंबई10 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज औरंगाबाद आणि मुंबईत राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध करत जोरदार आंदोलन केले.

मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळाबाहेर असणाऱ्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी राज्यपालांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तर, औरंगाबाद शहरातील क्रांती चौक येथे रास्ता रोको करण्यात आला.

राज्यपालांचा निषेध

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळासमोर कोश्यारिंचा निषेध करण्यात आला. यावेळी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. वीरेंद्र पवार म्हणाले की, काल राज्यपाल यांनी शिवाजी महाराजांबद्दल चुकीचे वक्तव्य केले. त्यांनी अनेकवेळा असे वक्तव्य केले आहे. आम्हाला सांगावे लागेल कि केवळ देशातच नव्हे तर जगभरात शिवाजी महाराजांचा आदर केला जातो.

...तर राजभवनावर आंदोलन

मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते म्हणाले की, शिवाजी महाराजांबद्दल असे वक्तव्य करणारे राज्यपाल आम्हाला नकोत. त्यांना हवे असेल तर त्यांनी त्यांच्या राज्यात जावे. आमची केंद्राकडे मागणी आहे की, राज्यपालांची महाराष्ट्रातून हकालपट्टी करावी. राज्यपालांना आता महाराष्ट्रात राहण्याचा अधिकार नाही. येत्या एक-दोन दिवसांत राज्यपालांची हाकलपट्टी झाली नाही तर मराठा क्रांती मोर्चातर्फे राजभवनावर आंदोलन केले जाईल.

औरंगाबादेत कार्यकर्ते ताब्यात

औरंगाबादेत क्रांती चौकात मराठा क्रांती मोर्चातर्फे आंदोलन करण्यात आले. मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केला. कार्यकर्ते वाहनांसमोर झोपले. राज्यपालांचा प्रतिकात्मक पुतळा तसेच टोपी जाळून त्यांचा निषेध करण्यात आला. यादरम्यान, काही आंदोलकांना पोलिसांनी ताब्यातही घेतले.

बातम्या आणखी आहेत...