आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाराष्ट्राच्या परंपरेला डाग लावू नका:अजित पवारांचे मुख्यमंत्री शिंदे-ठाकरेंना आवाहन, दसरा मेळाव्यात सामंजस्य दाखवा

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्राच्या संस्कृतीला डाग लागणार नाही, कमीपणा येणार नाही, असे वर्तन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात ठेवावे, असे आवाहन राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे.

लोकशाहीच्या परंपरा जपाव्यात

दसरा मेळाव्याच्या निमित्ताने उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे आज एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवार म्हणाले, दोघांनीही सामंजस्याची भूमिका घ्यावी, ताकद दाखवण्याचा, आपल्या पक्षाची भूमिका जनतेसमोर मांडण्याचा अधिकार दोघांनाही आहे. मात्र, हे करत असताना लोकशाहीच्या परंपरा जपायच्या असतात. दोन्ही नेत्यांनी कुणाबद्दलही अनादाराची भावना न दाखवता आपापल्या भूमिका मांडाव्यात.

शिंदे, ठाकरेंनी खबरदारी घ्यावी

अजित पवार म्हणाले, दसरा मेळाव्यात महाराष्ट्राच्या संस्कृतीला डाग लागणार नाही, महाराष्ट्राच्या संस्कृतीला बाधा येणार नाही, कमीपणा येणार नाही, तसेच दोन्ही गटांत कटुता वाढणार नाही, याची खबरदारी शिंदे व ठाकरेंनी घ्यावी, असे माझे आवाहन आहे.

शब्दाने शब्द वाढतो

अजित पवार म्हणाले, उद्धव ठाकरे व मुख्यमंत्री शिंदेंमधील वाद पराकोटीला गेले आहेत. शब्दाने शब्द वाढतो. अरेला कारेने प्रत्युत्तर दिल्याने वाद चिघळतो. त्यामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांनाही आपण एकमेकांचे शत्रू झाल्यासारखे वाटतो, मात्र राजकारणात असे नसते. राजकीय जोडे बाजुला ठेवून एकमेकांकडे सलोख्याच्या भावनेने पाहावे, असे माझे मत आहे.

शिंदेंना सांगितल होतं

अजित पवार म्हणाले, मी विधानसभा सभागृहातच उद्धव ठाकरेंनी जुळवून घ्या, असे एकनाथ शिंदेंना सांगितले होते. पण, प्रत्येकाने काही उद्दीष्ट ठरवलेले असते ते महत्त्वाचे असते. कुठलीही गोष्ट कायम राहत नाही. जसजसे दिवस जातात कटुता कमी होत जाते.

खरे आव्हान निवडणुकीचे

अजित पवार म्हणाले, दोन्ही गटांसाठी दसरा मेळावा महत्त्वाचा असला तरी अंधेरीच्या पोटनिवडणुकीत जनता कुणाच्या बाजुने कौल देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडेही लक्ष असणार आहे. चिन्ह कोणाला मिळते, यावरही बरेच काही अवलंबून आहे. धनुष्यबाण हे चिन्ह शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी मिळवल आहे. असे असले तरी आतापर्यंत अनेक पक्षांनी वेगवेगळ्या चिन्हांवर निवडणूक लढवल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसनेही पूर्वी चरखा, त्यानंतर बैल व आता घड्याळ या चिन्हावर निवडणूक लढवली आहे.

बातम्या आणखी आहेत...