आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • Ajit Pawar Calls Chhatrapati Sambhaji Raje, Requests Him To Come To The Meeting On 'Sarathi' Issue, Meeting Between The Two Leaders Tomorrow

'सारथी' प्रकरण:अजित पवारांचा छत्रपती संभाजीराजेंना फोन, 'सारथी' च्या मुद्द्यावरुन बैठकीला येण्याची विनंती, उद्या दोन्ही नेत्यांमध्ये बैठक 

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात सध्या कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. दरम्यान अनेक मुद्द्यांवरुन राज्यातील राजकारण तापलेले दिसत आहे. नुकतेच मराठा काँग्रेस मोर्चाने 'सारथी'च्या मुद्द्यावरुन सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बैठकीचे आयोजन केले आहे. यासाठी खासदार छत्रपती संभाजीराजे यांना फोन करुन अजित पवारांनी उपस्थित राहण्याची विनंती केली. 'सारथी'मधील विद्यार्थ्यांना योग्य मदत होत नसल्याचा आरोप संभाजी राजे यांच्याकडून करण्यात आला होता. 

छत्रपती संभाजीराजे यांनी ट्विट करुन या संदर्भात माहिती दिली आहे. 'मराठा समाजाच्या हितासाठी स्थापन झालेल्या व प्रचंड त्यागातून मिळवलेल्या सारथी संस्थेबाबत समाजाने जे आंदोलन उभं केलं आणि दबाव निर्माण केला, त्याचा आदर करत सरकारने चर्चेसाठी निमंत्रण दिले आहे. सारथी संदर्भात उद्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत बैठक' असे संभाजीराजे यांनी लिहिले आहे.

संभाजी राजे यांनी ट्विट करत लिहिले की...

'उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मला फोन करून मुंबईला चर्चेसाठी येण्याची विनंती केली. काही महिन्यांपूर्वी समाजाच्या वतीने पुण्यात सारथी कार्यालयाच्या बाहेर लाक्षणिक उपोषण केले होते. त्यावेळी जी आश्वासने सरकारने दिली होती. ती न पाळल्याचा अनुभव गाठीशी असताना सुद्धा समाजाच्या तीव्र भावना सरकारपर्यंत पोहचवणे हे माझे कर्तव्य समजून पुन्हा चर्चेला जाण्याचा निर्णय घेत आहे. माझ्यासाठी समाजाचे हित सर्वोच्च आहे.' असे छत्रपती संभाजी राजे म्हणाले.

संभाजीराजे यांनी ट्विटच्या माध्यमातून मांडल्या प्रमुख मागण्या 

1) सारथी ही ‘स्वायत्त’ संस्था म्हणून टिकली पाहिजे. स्वायत्ततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

2) जे अध्यादेश राज्यपाल शासन असताना गुप्ता नावाच्या अधिकाऱ्याने काढले ते सर्व रद्द केले पाहिजेत.

3) शासनाने कथित गैरव्यवहाराची चौकशी केली, तिच्यामध्ये काही तथ्ये आढळली का? किती रुपयांचा घोटाळा झाला? हे शासनाने जाहीर करावे. झालेला सर्व जमाखर्च हा ऑनलाईन करावा, अन्यथा सारथीची जाणीवपूर्वक बदनामी केली म्हणून जबाबदार अधिकाऱ्यांवर कार्यवाही करण्यात यावी.

4) तारदूत प्रकल्प हा समाजोपयोगी असून तो बंद करण्यात येऊ नये. उलट त्याची व्याप्ती वाढवण्यात यावी.

5) ज्या लाभार्थी विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती मिळाली नाही ती लवकरात लवकर देण्यात यावी.

6) शासनाने नवीन कोणकोणत्या योजना कल्पिल्या आहेत, त्या जाहीर करण्यात याव्यात.

गरीब मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन झालेली ही संस्था स्वायत्त तर राहिली पाहिजेच. पण तिला जास्तीत जास्त निधी दिला गेला पाहिजे. असेही संभाजीराजेंनी नमूद केले आहे.

0